esakal | पंकजा मुंडेंची उमेदवारी टळली; काय आहेत कारणं, काय होईल परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव टळले आहे. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याने पंकजा मुंडे इच्छूक नव्हत्या, असे म्हणणे आता गैर ठरणार आहे. मात्र, त्यांची उमेदवारी टळण्याची कारणे आणि त्याचे परिणाम नेमके काय आता यावर चर्चा होत आहे.

पंकजा मुंडेंची उमेदवारी टळली; काय आहेत कारणं, काय होईल परिणाम

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव टळले आहे. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याने पंकजा मुंडे इच्छूक नव्हत्या, असे म्हणणे आता गैर ठरणार आहे. मात्र, त्यांची उमेदवारी टळण्याची कारणे आणि त्याचे परिणाम नेमके काय आता यावर चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री पदावर बसून सहा महिने लोटत असल्याने उद्धव ठाकरे यांना आमदार होणे आवश्यक झाले होते. त्यांच्या विधान परिषदेच्या नियुक्तीवरुन माजलेल्या गदारोळानंतर अखेर विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणुक घेऊन ठाकरेंचा मार्ग सुकर करण्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला चार जागा मिळतील, असे मानले जाते. दरम्यान, या निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. अगदी त्याही त्यासाठी प्रयत्नशील वा इच्छुक होत्या. कारण, त्यांच्या स्वाक्षरीच्या पत्राने उमेदवारीसाठीचे कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरु होते. मात्र, भाजपने घोषीत केलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर पडल्याने त्यांच्या समर्थकांचा हिरमोड तर झालाच आहे शिवाय संतापाच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. 

रेल्वे अपघातात १६ मजूर ठार, पायी गावाकडे निघाले होते

पंकजा मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राजकीय वारसदार आहेत. भाजपच्या मास लीडरपैकी एक असून त्या महिला आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहेत. त्यांचा विधानसभेला राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. धनंजय मुंडेंना कॅबीनेट मंत्रीपदासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटले आहे. मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंकडून पराभूत झालेल्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने थेट विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद दिले होते. वास्तविक यावेळी विरोधीपक्षनेतेपद निवडीच्या प्रक्रियेवेळी पंकजा मुंडे या आमदारच नव्हत्या. त्यामुळे या पदाबाबत चर्चा गैरलागू आहे. परंतु, आता त्यांना विधान परिषदेवर तरी घ्यायला हवे होते. परंतु, त्यांना उमेदवारी नाकारली गेली. 

मागच्या वेळी सत्तेच्या काळात जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचे एकहाती वर्चस्व होते. बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थाही त्यांच्या अधिपत्याखाली होत्या. अगदी बीडच नाही, तर नगर, लातूर, परभणी, बुलढाणा, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील भाजपचे काही आमदार - खासदारही त्यांच्या मागेपुढे करत. मग, गोपीनाथ गडावरील मुंडे जयंती - पुण्यतिथीचा कार्यक्रम असो वा इकडे भगवानभक्तीगडावरील मेळावा असो. पण, त्याला कारण होते पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. पण, याच जिवावर त्या कधी पक्षातील स्पर्धकांना आव्हानवजा वक्तव्य करुन स्वत:च्या ताकदीची जाणिव करुन देत. वास्तविक त्यांची कालची आणि वर्तमानातील ताकद दुर्लक्षून चालणार नाही. पण, पक्ष अगोदर आणि व्यक्ती नंतर हे भाजपचे धोरण त्यांच्याकडून पाळले जायचे नाही आणि मग पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न होत. 

क्षणार्धात संपले, सोळा मजुरांना रेल्वेने चिरडले : जबाबदार कोण...

याचा पहिला प्रत्यय आला होता तो त्यांच्याकडील महत्वाचे मंत्रीपदे काढून घेणे आणि राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर यांना ताकद देणे. अशा काही घटना घडल्या की आपले आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कुठलीही कटुता नाही, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे देत. पण, जरी या दोघांत कटुता तेव्हा नसली आणि आताही नसेल. पण, राजकीय कुरघोड्या तर होणारच. आणि त्यामुळेच सत्तेच्या पाच वर्षात जिल्ह्याला विकास निधी मिळाला. पण, राजकीय पदांबाबत भाजप समर्थक कायम उपेक्षीत राहीले. शेवटच्या दोन - चार महिन्यांत ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्षपद आणि इतर काही महामंडळांचे संचालकपदांवर समाधान मानावे लागले. 

सत्तेची पाच वर्षे अशातच सरली आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला. जिल्ह्यातही भाजपची पिछेहाट झाली. पण, पुन्हाही पंकजा मुंडे यांनी आपला करारी बाणा काही सोडला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांदेखत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपनेत्यांना जे काही सुनावायचे ते सुनावले. पक्षाच्या कोअर समिती राजीनाम्याची घोषणा करत त्यांनी उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा व्यक्त करत सॉफ्ट कॉर्नर दिला. त्यांची ही कृती पक्षातील नेत्यांना रुचणारी तर नव्हतीच आणि पक्षाच्या संहितेत मोडणारी नव्हती हेही मान्यच करावे लागेल.

औरंगाबादमध्ये ५० कोरोना हॉटस्पॉट, कोणते ते वाचा

पुढेही पक्षातील नेते ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडत असताना पंकजा मुंडे मात्र अपेक्षा करायच्या. ही भूमिका देखील पक्षातील नेत्यांना विरोधाभासाचीच का वाटू नये. आणि म्हणूनच मास लीडर आणि पक्षाला गरज असणाऱ्या असूनही त्यांना उमेदवारी टाळण्यात आली.

त्यांना उमेदवारी टाळण्याने त्यांच्या समर्थकांचा हिरमोड तर झालाच आहे. शिवाय संतप्त प्रतिक्रीयाही व्यक्त हेात आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जोरदार पकड बसविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना पालकमंत्रीपदासह भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषदही राष्ट्रवादीने पूर्वीच खेचून घेतली आहे. आता पंकजा मुंडे यांना अगोदर पुन्हा एकदा जिल्ह्यात बांधणी करावी लागणार आहे.