सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल, पंकजा मुंडे यांची शिवाचार्य महाराजांना श्रध्दांजली

प्रवीण फुटके
Tuesday, 1 September 2020

समाजाला दिलेली सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

परळी वैजनाथ (जि.बीड) : वीरशैव समाजातील थोर संत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी समाजाला दिलेली सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे थोर संत तर होतेच.

पण एमबीबीएस डॉक्टरही होते, त्यामुळे समाज सुदृढ व एकोप्याने राहवा यासाठी त्यांनी आपल्या प्रवचानातून कार्य केले. समाजातील अंधश्रद्धा आणि वाईट रूढी परंपरा यावरही त्यांनी प्रहार केले. महात्मा बसवेश्वर यांचे विचार जोपासताना त्यांनी सर्वजाती धर्मातील लोकांना आपल्या प्रवचनातून समानतेची शिकवण दिली. पर्यावरण वाढीसाठी त्यांनी वृक्षलागवड व जल संवर्धनावर भर दिला होता, यात त्यांना विशेष रुची होती.

डॉ.शिवाचार्य महाराजांच्या निधनाने ६६ वर्षांची परंपरा असलेली चापोली ते कपिलधार...

प्रखर देशाभिमानी असलेल्या शिवाचार्य महाराजांचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर विशेष स्नेह होता. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये परळी येथे श्रावण महिन्यात झालेल्या त्यांच्या तपोनुष्ठान सोहळ्याचे स्वागताध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला होता. त्यावेळी त्यांच्या कार्याची महती अधिक जाणवली असे सांगून त्यांच्या जाण्याने आपल्याला तीव्र दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

(संपादन - गणेश पिटेकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Pay Homage To Shivling Shivacharya Maharaj