
परळीत खासदार प्रितम मुंडेंना पोलिसांनी घेतले ताब्यात
परळी वैजनाथ (बीड): भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी (ता.२६) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. येथे खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ईटके कॉर्नर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार मुंडे यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले व काही वेळाने सोडण्यात आले.
भाजपच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी व काही जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या निवडणूका ओबीसींचे आरक्षण मिळेपर्यंत मिळेपर्यंत रद्द करण्यात याव्यात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. येथे जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून गंगाखेड, बीड कडे जाणाऱ्या मार्गावरील ईटके चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे सकाळी ११ वाजल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी प्रमुख नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडली, खासदार डॉ मुंडे यांनी सांगितले की, ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने काही जिल्ह्यात निवडणूका घोषित केल्या आहेत. या निवडणूका रद्द करा व ओबीसींना पहिल्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण द्या नंतरच निवडणूका घ्या, शासनाने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल व आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात करु असा इशारा डॉ मुंडे यांनी यावेळी दिला.
नंतर पोलिसांनी खासदार मुंडे व नेत्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजपचे जेष्ट नेते फुलचंद कराड, तालुका अध्यक्ष सतिष मुंडे,जुगलकिशोर लोहिया, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, नगरसेवक पवन मुंडे, जयश्री गित्ते आदि नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.