(व्हिडिओ पाहा) : धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची परळीत व्यापाऱ्याला मारहाण, शहर बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

सराफा व्यापारी अमर वसंतराव देशमुख यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता.१७) घडला. या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

परळी (जि.बीड) : सराफा व्यापारी अमर वसंतराव देशमुख यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता.१७) घडला. या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. मारहाण झालेले व्यापारी राष्ट्रवादीचेच समर्थक असल्याची माहितीही समोर येत आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या प्रकरणात गणेश कराड याच्यासह पाच जणांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाणीच्या निषेधार्थ मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेडने बंद पुकारला आहे.

हेही वाचा- लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 10 हजारांचा दंड, उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश (वाचा कशामुळे)

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रोडे चौक परिसरात अमर देशमुख यांचे गणराया ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. त्यांचे आणि गणेश कराड यांच्यात आर्थिक व्यवहारावरुन वाद होता. दरम्यान, सोमवारी गणेश कराड याच्यासह काही युवक एका जीपमधून आले. हातात हत्यारे, काठ्या, रॉड आदी घेऊन या टोळक्याने व्यापारी देशमुख यांच्या दुकानात प्रवेश केला.अमर देशमुख यांना दुकानातून बाहेर काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आजुबाजुचे इतर व्यापारी जमा झाल्यामुळेआरोपीने तेथुन पळ काढला. दरम्यान या मारहाणीचा निषेध करत मंगळवारी (ता.१८) परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आलेआहे. सकाळपासूनच दुकानदारांनी आपापले व्यवहार बंद ठेवले आहेत. मराठा महासंघ व संभाजी बिग्रेडच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचलंत का ?- लिंग बदलून पुरुष बनलेल्या बीडच्या ललित साळवेंना भेटली सीमा, औरंगाबादेत विवाहबद्ध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parali rada by Dhananjay Munde supporters in Beed district