दीड वर्षाच्या चिमुकल्याची आईसाठी आक्रोश, अनेकांनी व्यक्त केली हळहळ | Parbhani Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child
मायलेकाची ताटातूट, दुचाकी अपघातात आईचा दुर्दैवी मृत्यू

दीड वर्षाच्या चिमुकल्याची आईसाठी आक्रोश, अनेकांनी व्यक्त केली हळहळ

जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर-जालना महामार्गावरील गतिरोधकावर दुचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.१७) दुपारी बाराच्या सुमारास घडली. ही घटना जिंतूरपासून तीन किलोमीटरवर अकोली शिवारात घडली. सुदैवाने मृत महिलेचा पती व दीड वर्षांचा मुलगा बचावले. हिंगोली जिल्ह्यातील राहुली गावातील रहिवासी रवी पतंगे हे पत्नी पल्लवी (वय २३), दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दुचाकीवरुन (एमएच २० सीएक्स ७१०१) हिंगोलीहून औरंगाबादकडे जात असताना अकोली पुलाजवळ रस्त्यावरील गतिरोधकावर (Jintur) दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी जोरात रस्त्यावर (Parbhani) कोसळली. यात मागे बसलेल्या महिलेच्या डोक्याला जबर मार लागून ती गंभीर जखमी झाली.

हेही वाचा: 'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले'

परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त महिलेस शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅ.चव्हाण यांनी महिलेस डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत घोषित केले. सुदैवाने या अपघातात पती व दीड वर्षीचा मुलगा सुखरूप आहे. दुचाकीचे बरेच नुकसान झाले. या प्रकरणाचा पोलिस ठाण्यात घटना नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील महामार्गावर देवगाव फाटा ते जिंतूर या २७ किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी ३६ पेक्षा जास्त गतिरोधक आहेत. बहुतेक ठिकाणी सावधानतेसाठी कसल्याही खूणा नाहीत किंवा फलकही लावलेले दिसत नाहीत. त्यामुळे वाहन चालवताना गतिरोधक चालकाच्या लक्षात येत नाही. परिणामी सदरील रस्त्यावर लहान-मोठे अपघात नेहमीच घडताहेत. त्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या.

रुग्णालयात हळहळ

सदरील घटनेत दीड वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याच्या आईला काळाने हिरावून नेले. त्यामुळे आईसाठी आक्रोश करणाऱ्या बालकाची अवस्था पाहून रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

loading image
go to top