esakal | परभणी ः रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मेडीकलवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या कारवाईत दुकान सिल करण्यात आले असून दुकान मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली.

परभणी ः रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मेडीकलवर कारवाई

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : रेमडेसिव्हर इंजेक्शन अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करणाऱ्या शहरातील हाके मेडीकलवर बुधवारी (ता. सात) रात्री उशिरा महसुलसह अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. दुकान मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली.

परभणी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या हाके मेडिकलचा चालक चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री करताना रंगेहात सापडला. दरम्यान शासनाकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडिसेव्हर या इंजेक्शनच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असले तरी या किमतीपेक्षा दीडपट आणि काही ठिकाणी दुप्पट दराने या इंजेक्शनची विक्री होत आहे. त्यानुसार हाके मेडिकल या दुकानावर आलेल्या एका ग्राहकाला चार हजार 200 रुपयांचे इंजेक्शन तब्बल सहा हजार रुपयांना विकले जात होते. उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी औषधी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह या दुकानात लावलेल्या सापळ्यात दुकानदार रंगेहात अडकला. ज्यामुळे डॉ. श्री. कुंडेटकर यांनी नवामोंढा पोलिसांना बोलावून दुकानदार विजय हाके आणि त्यांच्याकडे कामाला असलेल्या नोकराला पोलिसांच्या स्वाधीन केले. शहरातील इतर मेडिकल दुकानांवर देखील महसूल आणि औषधी प्रशासन पाळत ठेवून असून, ज्या ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, त्यांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचाविशेष बातमी : जोखीम उचलत मोहफुलाच्या झाडापासुन रोजगाराचा आधार

गेल्या आठ दिवसांपासून परभणीत रेमडसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील कंपन्यांकडे औषधी प्रशासनाने 830 इंजेक्शनची मागणी केली होती. तसेच या ठिकाणचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दूरध्वनीवरुन ही परिस्थिती कळवून इंजेक्शनचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार परभणीसाठी तातडीने 600 इंजेक्शन ता. पाच एप्रिलला उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र, अनेक मेडिकल दुकानदारांच्या म्हणण्यानुसार हे इंजेक्शन त्याच दिवशी विक्री झाले. आता इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक मेडिकल दुकानदारांनी हे इंजेक्शन दाबून ठेवले असून, ओळखीच्या ग्राहकांना तसेच ज्यादा दर देणाऱ्या ग्राहकांनाच विक्री करत असल्याने अनेक गोरगरीब रुग्ण या इंजेक्शनपासून वंचित राहत आहेत.

अशी केली कारवाई...
शहरातील बस स्थानकाजवळील मेडिकल लाईनमध्ये असलेल्या काही मेडिकलमध्ये कोरोनासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सापळा लावला होता. ते स्वतः त्या भागात दोन तास थांबून होते. त्यांनी या भागातील मेडिकल दुकानांवर येणाऱ्या ग्राहकांवर पाळत ठेवली होती. मेडिकल दुकानदारांकडून या इंजेक्शनची विक्री होते का, आणि होत असेल तर ती किती रुपयात होते? यावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे


 

loading image