परभणी : शेतकऱ्यांसाठी ॲक्शन प्लॅन तयार ! आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपोषणाचे फलित

गणेश पांडे
Thursday, 5 November 2020

आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपोषणाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.

परभणी : जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपोषणानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. गुरुवारी (ता.पाच) बॅंक अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात मॅरॉथॉन बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसंबंधी कामासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपोषणाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थइती होती. या बैठकीत शेतकरी प्रश्नांच्या अनुशंगाणे निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रिजेक्ट केलेले पीक कर्जाचे प्रस्ताव परत मागून त्यांना पिक कर्ज देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.  वयाची अट टाकुन जे प्रकरण रद्द केलेत ते मंजुर करुन कर्ज देण्यात यावेत, प्रत्येक शेतकऱ्याच्या मागणी अर्जाची नोंद ठेवण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बँकांना सॉफ्टवेअर १५  दिवसात तयार करुन शेतकऱ्यांना 'एसएमएस' सुविधा देण्याबाबत निर्णय या बैठकीत झाला. दत्तक शाखा बदललेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व पीक कर्ज दिवाळीपूर्वी देण्याचे ठरवण्यात आले.

हेही वाचा परभणी जिल्ह्यात घरगुती सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी यांनी त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही त्यांचे अर्ज स्वीकारून रब्बी हंगामात कर्ज देण्याचे या बैठकीत ठरले. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढवण्यासंदर्भात चर्चा होऊन तसा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे  पाठविण्याचे ठरले. शेतकऱ्यांसाठी ॲप बनवून (first come first serve) प्रमाणे सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे अर्जांची नोंद होऊन दलाली प्रक्रियेस आळा बसेल. या बैठकीत वरील सर्व विषय तात्काळ मार्गी लावण्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बॅंक अधिकाऱ्यांना सुचना केल्या. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी यांनी त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिककर्जा संदर्भात चांगली चर्चा झाली आहे. निश्चित यातून सकारात्मक बदल दिसून येतील. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

- मेघना बोर्डीकर, आमदार जिंतूर विधानसभा

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Action plan prepared for farmers! Consequences of MLA Meghna Bordikar's fast parbhani news