परभणी : निवडणुकीची वाट पाहून इच्छुक दमले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani mahanagarpalika

परभणी : निवडणुकीची वाट पाहून इच्छुक दमले

परभणी : परभणी महापालिकेची मार्च-एप्रिल महिन्यात होऊ घातलेली निवडणूक अखेर नियोजित वेळेत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह कार्यकर्त्यांमध्ये सामसूम आहे. दरम्यान, ज्या इच्छुकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली होती तेही निवडणुकीची वाट पाहून दमले असल्याचे चित्र आहे. गेल्या चार-सहा महिन्यांपासून जोरदार तयारीला लागलेले व मतदारांच्या मागेपुढे धावणारे इच्छुक मात्र आता मागण्यांचा जोर वाढल्यामुळे हैरान झाले आहेत.

परभणी शहर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत ता. १५ मे २०२२ ला पूर्ण होत असल्यामुळे मे २०२२ पर्यंत निवडणुका होऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड अपेक्षित होती. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशदेखील यंत्रणेला दिले होते. अगोदर एक तर नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करून तो आयोगाकडे सादरदेखील करण्यात आला होता. महापालिकेची सदस्य संख्येतही वाढ होऊन ती ६५ वरून ७५ वर गेली आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या तयारीला लागली होती तर बहुतांश पक्षांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती.

इच्छुकांच्या तयारीने घेतला वेग

शहरात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते. गत सहा महिन्यांपासून आपआपल्या प्रभागांचा आढावा घेत व प्रभागांची ऐकीव रचना गृहित धरून काही विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक व उदयोन्मुख उमेदवारांनी तयारीसुद्धा सुरू केली होती. कधी न दिसणारे, कोरोना काळात गायब झालेले अनेक विद्यमान नगरसेवकांचा प्रभागात वावर वाढू लागला होता. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काहींनी जुन्या प्रभागांचा काही भाग सोडून नवीन वसाहतींना भेटी-गाठी देणे, आश्वासने देणे देखील सुरु केले होते. माजी सदस्यदेखील कामाला लागले होते. त्यातही विविध पक्षातील उदयोन्मुख कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य युवक, नागरिकही निवडणुकीत उतरण्याची तयारी करू लागले होते.

अनेकजण त्रस्त

मार्च-एप्रिल महिन्यात निवडणूक होईल या अपेक्षेने अनेक इच्छुकांनी आपआपल्या वसाहतींमध्ये नागरिकांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडविण्यास सुरवात केली होती. नाली काढणे, बंद पडलेले पथदिवे लावणे, घंटागाडी पाठवणे, थोडीफार रस्त्यांची डागडुजी करणे अशी कामे ते मोठ्या उत्साहाने करू लागले होते. अनेक वेळा तर एका समस्येसाठी दोन-तीन इच्छुकसुद्धा पुढाकार घेतानाचे चित्र होते. काही पदरमोड करून कामे करीत होते तर रात्रीच्या ओल्या पार्ट्यांनाही सुरुवात झाली होती. विविध पक्षांच्या नेतेमंडळींचादेखील विविध वसाहतींमध्ये वावर वाढला होता. बैठका, चर्चासुद्धा होऊ लागल्या होत्या. नागरिकांना तत्काळ डिमांड पूर्ण करण्याची आश्वासने देखील मिळू लागली होती. पण, अनेक इच्छुकांनी आता नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

Web Title: Parbhani Aspiring Tired For Elections Wait Now Shocked Increase In Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top