Parbhani : गंभीर रुग्णाची चिखलवाटेतून ‘मिरवणूक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani

Parbhani : गंभीर रुग्णाची चिखलवाटेतून ‘मिरवणूक’

पूर्णा : दोन वर्षांपासून गावाच्या रस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या माहेर (ता. पूर्णा) येथील गावकऱ्यांनी रोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातून ठोस मार्ग निघाला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी (ता. २९) गावातील ज्येष्ठ आणि अंथरुणाला खिळलेल्या आजारी व्यक्‍तींची चिखलवाटेने पालखीतून मिरवणूक काढून संताप व्यक्त केला.

मागील पाच सहा दिवसांपासून रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी मुंडण आंदोलन, टाळ्या थाळ्या वाजवणे, ऊर बडवणे, अर्धनग्न अवस्थेत बोंबा मारणे, रस्त्यावरील चिखलात बसून गडबडा लोळणे अशी लक्षवेधी आंदोलने केली. मागील दोन वर्षांत त्यांनी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींना असंख्य निवेदने दिली. बेमुदत उपोषणे केली. परंतु, त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली. त्यामुळे गावकरी वैतागून गेले आहेत. या रस्त्याने माणसांना सोडा जनावरांनाही चालता येत नाही, अशी बिकट परिस्थिती आहे.

या गावात पाचवीपर्यंत शाळा आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ताडकळसला पायी जाणे-येणे करावे लागते. खराब रस्त्यामुळे शाळेत जाता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रुग्ण, वृद्ध, गरोदर माता यांना होणाऱ्या त्रासाविषयी तर कल्पनाच करवत नाही. त्यांना डोली करून अथवा बाजेवर टाकून न्यावे लागते. इतक्या मरणयातना जिवंतपणी भोगावयास लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आजारी असलेले किशनराव इंगळे यांनी दिली.

होणाऱ्या त्रासाला वैतागून आज गावकऱ्यांनी गावातील वृद्ध व आजारी रुग्णांची डोली, पालखी व बाजेवर बसवून खड्ड्याच्या व चिखलाच्या रस्त्यावरून मिरवणूक काढत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी रस्त्यासाठी साठ लाख रुपये नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यावर काम सुरू होईल असे सांगितले. परंतु, गावकऱ्यांनी मात्र आधी काम सुरू करा तरच आंदोलन थांबेल; अन्यथा हा लढा अधिकच तीव्र करण्याचा निर्धार केला.

आमचे तर सगळे आयुष्य या रस्त्याच्या यातना सहन करण्यात गेले. आमच्या मुला-मुलींनाही तेच भोगावे लागले. नातवंडांच्या आयुष्यात तरी चांगला रस्ता यावा म्हणून ८५ व्या वर्षीही मी आंदोलनात सहभागी झाले. आम्हीही माणसे आहोत हे कोणीच का लक्षात घेत नाही. मुख्यमंत्रीसाहेब, मंत्रीसाहेब तुम्ही तरी ध्यान द्या!

- विठाबाई इंगळे, ग्रामस्थ