
Parbhani : सर्वसामान्यांना मदत करण्याचे ध्येय; संदीपान भुमरे
परभणी : सर्वसामान्य जनतेला सढळ हाताने मदत करण्याचे काम युती शासनाने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे काम सातत्याने सुरू आहे. वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न तातडीने सोडविले जावेत, अशी अपेक्षा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी रविवारी (ता. १२) व्यक्त केली.
येथील बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे यांच्या पुढाकारातून वैद्यकीय मदत कक्ष व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भुमरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख, माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, सहसंपर्कप्रमुख भास्कर लंगोटे, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, महानगर प्रमुख प्रवीण देशमुख, तालुकाप्रमुख रावसाहेब पांडोळे, प्रमोद तारे,
दलित आघाडी जिल्हाप्रमुख धम्मदीप रोडे, शहर संघटक शेख शबीर आदींची उपस्थिती होती. यावेळी मंत्री भुमरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचा तथा जनतेच्या मतांचा आदर करणारे सरकार एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले आहे. जनतेला सढळ हाताने मदत करण्याचे काम सुरू आहे. परंतु, मागील अडीच वर्षात केवळ कामे थांबविण्याचे काम झाले. ज्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी जीवन खर्ची केले, त्यांच्या वयाचाही विसर अदित्य ठाकरे यांना पडला आहे’’,
असेही ते म्हणाले. मारुती इक्कर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रभाग प्रमुख मोहन टाक, अशोक गिराम, राजेभाऊ नाथे, गणेश खुपसे, संजय खंदारे, दिगंबर सूर्यवंशी, विक्की हातागळे, बाबाराव घाडगे, अमोल ढगे, सतीश कदम, शिवा गंडे, गोविंद डोंगरे, बाळासाहेब जाधव, शाकेर, पंढरीनाथ साखरे, हनुमान घाटूळ यांनी पुढाकार घेतला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन परभणीतील जनतेने १९८९ पासून हिंदूत्वासाठी मतदान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करणारा मी परभणी जिल्ह्यातील पहिला पदाधिकारी आहे. ता. २४ जुलैला मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. परभणीतील जनता येथून पुढेही बाळासाहेबांच्या विचारांना व मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला साथ देईल.
- माणिक पोंढे पाटील, उपजिल्हा प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना