esakal | ... तर परभणी शहराला मिळेल आठ दिवसाआड पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नव्या जलकुंभाचे पाणी जुन्या जलकुंभाला दिल्यास हे शक्य; खाजा कॉलनीतील प्रयोग यशस्वी

... तर परभणी शहराला मिळेल आठ दिवसाआड पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : ‘पाणी उशाला, कोरड घशाला’ अशी शहरातील नागरिकांची परिस्थिती झाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे आठ ते दहा जलकुंभ गेल्या महिनाभरापासून भरलेले असताना नागरिकांना २०-२० दिवस निर्जळीला तोंड द्यावे लागत आहे. नुकताच खाजा कॉलनी येथे नव्या जलकुंभाचे पाणी जुन्या जलकुंभाला देण्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्याच पद्धतीने शहरातील जुने जलकुंभ भरले तर पाणीपुरवठा आठ दिवसांवरदेखील येऊ शकतो व पाणी मिळू लागल्यास नळजोडणीच्या कामालादेखील गती येऊ शकते.
परभणी महापालिकेची नवीन यूआयडीएसएसएमटी व अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. जलकुंभासह वितरण व्यवस्थेच्यादेखील पाणी चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. नव्याने बांधलेले जवळपास आठ जलकुंभ अपवाद वगळता धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून भरून ठेवण्यात आलेले आहेत. तर जुने जवळपास ११ जलकुंभ आहेत. ते राहाटी येथील पाण्याने भरले जातात.

जुन्या जलकुंभांना नव्या योजनेचे पाणी
खाजा कॉलनी येथील नुकताच एक प्रयोग झाला. तेथील एमबीआरमधील पाण्याने जुना जलकुंभ भरून घेण्यात आला व ते पाणी सोडण्यात आले. त्यामुळे १५ ते २० दिवस पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना लवकर पाणी मिळाले. असेच शहरातील जुने जलकुंभ सद्यःस्थितीत धर्मापुरी व कारेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून आलेल्या पाण्याने भरून घेतल्यास शहराचा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर येऊ शकतो.

हेही वाचा व पहा -Video: लढाई निश्चित जिंकणार; पण तुम्ही घर सोडू नका

खाजा कॉलनी येथील जलकुंभातून पाणीपुरवठा शक्य
खाजा कॉलनी येथील जुना जलकुंभ तेथे नव्याने बांधण्यात आलेल्या एमबीआरमधून सातत्याने भरून घेतल्यास ते पाणी विद्यानगर, सरकारी दवाखाना, पोलिस हेडक्वार्टर तसेच खंडोबापर्यंत पाठवले जाऊ शकते. तर कारेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ममता कॉलनी, एमआयडीसी, राजगोपाचालारी उद्यान, युसूफ कॉलनी येथील जलकुंभांना पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रानी दिली. परंतु, महापालिका नागरिकांची निर्जळी थांबविण्यासाठी अशा पद्धतीने पाण्याची विभागणी करून वितरण का करीत नाहीत? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

नळजोडणीला गतीही मिळण्याची शक्यता
शहरातील जुन्या वितरण व्यवस्थेवरील नागरिकांना जर आठ-दहा दिवसांला नियमित पाणी मिळत असेल तर नवीन वितरण व्यवस्थेवरील नळजोडणी प्रक्रियेला गतीदेखील मिळू शकते. ज्या भागात नवीन वितरण व्यवस्था आहे, त्या भागातील नागरिक नियमित पाणी मिळत असल्यामुळे नळ जोडण्या घेतील. तेथील कामे पूर्ण झाल्यास जुनी वितरण व्यवस्था बंद करण्याची तारीख निश्चित केल्यास तेदेखील नळधारक नवीन वितरण व्यवस्थेवर नळजोडण्या घेतील. सद्यःस्थितीत तर नळजोडणीचे उद्दिष्ट किमान ५० हजारांचे असताना अद्याप ५०० नळजोडण्यादेखील झालेल्या नाहीत. अशीच परिस्थिती व गती राहिल्यास ५० हजारांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - संचारबंदीत नांदेड गोळीबाराने हादरले, एक ठार, दोन गंभीर.


एकाच वेळी २६ एमएलडी पाणी साठा
शहरात जुने ११ जलकुंभ असून त्यांची साठवण क्षमता एक कोटी २३ लक्ष ८३ हजार लिटरची आहे. (१२.३८ एमएलडी) तर नवे दोन एमबीआरसह दहा जलकुंभ असून त्यांची साठवण क्षमता एक कोटी ३८ लक्ष ५० हजार लिटर्स (१३.८५ एमएलडी)ची आहे. धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रे ६७ एमएलडीचे आहे, तर कारेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र १८ एमएलडीचे सांगितले जाते. एकूण पाणी शुद्धीकरणाचा विचार केला तरी दररोज ८५ एमएलडी पाणी शुद्ध होऊ शकते. तर शहराची लोकसंख्या साडेतीन लाख गृहीत धरली व १३५ लिटर दरडोई पाणी पालिकेने दिले तरी दररोज शहराला केवळ ४७ एमएलडी पाणी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी प्रत्येक जलकुंभ दोन वेळेस भरून घ्यावा लागेल.

loading image