
परभणी : शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत समिती
परभणी - शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय पातळीवर मानक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. या राष्ट्रीयस्तरावरील समितीच्या अध्यक्षपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर भविष्यात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीकविमा करिता ड्रोनचा वापर होणार आहे. या ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय पातळीवर मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यासाठी देशाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मणी यांची नियुक्ती झाली.
समितीत नवी दिल्ली येथील कृषी मंत्रालयातील उपायुक्त एस. आर. लोही सदस्य सचिव आहेत. पीक संरक्षण विभागाच्या डॉ. अर्चना सिन्हा, आयसीएआरचे डॉ. आर. एन. साहू, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. सुनील गोरंटीवार, गुंटूर येथील डॉ. ए. सामभाय, आयएआरआयचे डॉ. दिलीप कुशावाह, कोईम्बतुर येथील डॉ. एस. पाझानिवेलन, हैद्राबाद येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. रामगोपाल वर्मा आदींची समितीमध्ये समावेश आहे.
असे असणार समितीचे कार्य
समिती पीकनिहाय ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या वापरासाठी मानक कार्य पद्धतीचा (एसओपी) मसुदा तयार करून ता. ३० सप्टेंबरपर्यंत देशाच्या कृषी मंत्रालयास सादर करणार आहे. ही समिती शेतीतील निविष्ठा व तंत्रज्ञानाचा सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रभावी वापर यावर अभ्यास करून एसओपी निश्चित करेल.