परभणी : रस्त्यासाठी झोपले चिखलात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani congress agitation

परभणी : रस्त्यासाठी झोपले चिखलात!

परभणी - मोठा मारोती ते उघडा महादेव मंदिर या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते विशाल बुधवंत यांनी मंगळवारी कारेगाव रस्त्यावरील गणपती चौकात भरपावसात चिखलात झोपून आंदोलन केले.

महापालिकेने मोठा मारोती ते उघडा महादेव मंदिर हा रस्ता बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु, पावसाळ्यातही हजारो खड्डे झालेल्या या रस्त्यांच्या किमान दुरुस्तीकडे ना महापालिकेने लक्ष दिले ना सार्वजनिक बांधकाम विभागाने. पर्यायी रस्ता नसल्यामुळे अशा खड्ड्यांच्या रस्त्यातूनच रोज हजारो नागरिकांना अंगावर चिखल, घाण पाणी घेत जा-ये करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बुधवंत यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास गणपती चौकासमोरील एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी या भागातील शेकडो नागरिक त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या चौकात एकत्र आले होते.

आंदोलनाविषयी भूमिका मांडताना श्री. बुधवंत म्हणाले, सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. शासनाने साडेनऊ हजार कोटींची कामे थांबवली आहेत. त्यामध्ये या रस्त्याच्या कामाचादेखील समावेश असल्याचे श्री. बुधवंत म्हणाले. परभणी ः काँग्रेसचे नेते विशाल बुधवंत यांनी मंगळवारी कारेगाव रस्त्यावरील गणपती चौकात रस्त्यावरील चिखलात झोपून आंदोलन केले. (दुसऱ्या छायाचित्रात) महापालिकेचे शहर अभियंता वसीमखान पठाण यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु ती श्री. बुधवंत यांनी ती नाकारली.

प्रशासकावर गंभीर आरोप

बुधवंत यांनी महापालिका प्रशासकांवर गंभीर आरोप केले. बुधवंत म्हणाले, ‘‘दोन-तीन टक्के कमिशन आणि प्रलंबित देयके काढणे, बोगस कामे करण्याचा प्रशासकांचा घाट सुरू आहे’’, असे गंभीर आरोपही श्री. बुधवंत यांनी केले. श्री. बुधवंत यांचे आंदोलन सुरू होताच महापालिकेचे शहर अभियंता वसीमखान पठाण हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; तसेच आयुक्तांचे भ्रमणध्वनीवर बोलणे करून देतोही म्हणाले.

परंतु, आयुक्त आल्याशिवाय व त्यांनी रस्त्याची परिस्थिती पाहिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका बुधवंत यांनी घेतली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आंदोलनस्थळी आले. श्री. बुधवंत यांची मागणी विचारात घेऊन त्यांना आश्वासन दिले. त्यामुळे श्री. बुधवंत यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

शहरातील अनेक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागकडे वर्ग करण्यात आले आहेत. या रस्त्याची निविदादेखील काढण्यात आलेली असून, मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत येत्या तीन-चार दिवसांत, सार्वजनिक बांधकाम विभाग असो की महानगरपालिका, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

- रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा, परभणी.

Web Title: Parbhani Congress Agitation Against Municipal Damage Bad Roads

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top