esakal | Covid 19: दिलासादायक! परभणी जिल्ह्यातील ९९ टक्के बेड्स रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Covid 19: दिलासादायक! परभणी जिल्ह्यातील ९९ टक्के बेड्स रिक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी: जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता.१२) सक्रीय रुग्ण संख्या जरी ९३ असली तरी बहुतांश कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात असून जिल्ह्यातील काही कोविड रुग्णालये व हेल्थ केअर सेंटर्स फक्त २०-२५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्यातील २४ कोरोना केअर सेंटर्स पूर्णतः रिकामी झाली आहेत. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१ हजार ५९ झालेली असून त्यापैकी ४९ हजार ६८२ रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे. तर एक हजार २८४ जण मात्र दुर्देवी ठरले आहेत. सोमवारपर्यंत ९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बहुतांश सीसीसी व डीसीएससी केंद्रे रिकामी
जिल्ह्यातील अपवाद वगळता ६६ पैकी चार कोरोना रुग्णालये असून त्यापैकी शासकीय व महिला रुग्णालयात किती रुग्ण आहेत, याची माहिती उपलब्ध झाली नाही. परंतु ती संख्या देखील कमी असल्याचे सांगितले जाते. ३८ कोरोना हेल्थ केअर सेंटर्स असून त्यापैकी ३४ रिकामी झालेली असून पाच सेंटर्स मध्ये १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २४ पैकी २४ कोरोना केअर सेंटर्स खुली झाली आहेत.

हेही वाचा: Maratha Reservation: आरक्षणासाठी ‘छावा’ घेणार आक्रमक भूमिका

नागरिकांचा प्रतिसाद चांगला
जिल्ह्यात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडसह एकूण बेड्सची संख्या तीन हजार ९६१ पर्यंत वाढविण्यात आली होती. मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर केला होता. शासकीयसह खासगी कोरोना सेंटर्स देखील हाऊसफुल्ल झाली होती. अपेक्षित ठिकाणी रुग्णांना जागा देखील मिळत नव्हती. परंतु सद्यस्थितीत मात्र जवळपास ९९ टक्के बेड रिक्त झाले असून ही किमया शासन, प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे साधली गेली आहे.

हेही वाचा: 'शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास बॅंकांनी हात आखडता घेऊ नये'

तिसऱ्या लाटेचा धोका कायम
जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमालीचा घटला आहे. दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या एक आकड्यावर आली आहे. नागरिकांनी हाच संयम कायम ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट अधिक घातक असल्याचे सांगितले जाते. त्या लाटेचा धोका कायम असून नागरिकांना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास ती लाट देखील थोपवली जाऊ शकते.

loading image