Parbhani : पीकविम्यासाठी ३ लाखांवर पूर्वसूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीक विमा योजना

Parbhani : पीकविम्यासाठी ३ लाखांवर पूर्वसूचना

परभणी : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्‍चात नुकसान या जोखीमबाबीअंतर्गत पीकविमा भरपाईसाठी विमा कंपनीकडे विविध माध्यमांतून शेतकऱ्यांनी ३ लाख ९९ हजार ७७७ पूर्वसूचना (इंटिमेशन) दाखल केल्या आहेत. विमा कंपनीने एकूण २ लाख ६८ हजार ७१७ पूर्वसूचना स्वीकारल्या, तर १ लाख ३१ हजार ६० पूर्वसूचना नाकारल्या (रिजेक्ट) आहेत. गुरुवार (ता. २७) पर्यंत ६३ हजार ८०६ शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात या वर्षीच्या पीकविमा योजनेअंतर्गत एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ प्रस्ताव्दारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार १२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. त्यात सोयाबीनसाठी ४ लाख ८ हजार ९४ शेतकऱ्यांनी ३ लाख ३४ हजार ९४ हेक्टर, कपाशीसाठी ६५ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ३१ हजार १०४ हेक्टर, तुरीसाठी ९३ हजार ८२३ शेतकऱ्यांनी ३६ हजार ६३३ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले आहे. जून ते ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी, तसेच सततचा पाऊस, सप्टेंबर-ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे शेतातील उभे सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे तसेच कापणी केलेले सोयाबीन, बोंडातून फुटलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबीअंतर्गत पीकविमायोजनेत सहभागी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे कॉल सेंटरद्वारे ८७ हजार ४६८ पूर्वसूचना, ई-मेलद्वारे २४ पूर्वसूचना, सुविधा केंद्रामार्फत ३४ हजार ९९८ पूर्वसूचना, पीकविमा पोर्टलवर २ लाख ७७ हजार २९१ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचे बाधित क्षेत्र हे एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

त्यामुळे सर्व महसूल मंडलांमध्ये सर्व पिकांचे २५ टक्के सँपल सर्वे करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. त्यानुसार गुरुवार (ता. २७)पर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत १२ हजार ४३६ ठिकाणचे रँडम सँपल सर्वेचे नियोजन असून, त्यापैकी १० हजार ७९३ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण झाले. एकूण ५५ हजार ९६० सर्वेक्षण पूर्ण झाले, तर १ हजार ६४३ पूर्वसूचनांचे सर्वेक्षण सुरू होते. काढणीपश्‍चात नुकसान या बाबीअंतर्गत ९ हजार ३२ ठिकाणचे सर्वेक्षणाचे नियोजन आहे. त्यापैकी ७ हजार ८४८ सर्वेक्षण पूर्ण झाले १ हजार १८६ ठिकाणी सर्वेक्षण सुरू होते.

१ लाख ३१ हजारांवर पूर्वसूचना नाकारल्या...

शेतकऱ्यांनी दुष्काळ या पर्यायांतर्गत दाखल केलेल्या २०हजार ६४७ पूर्वसूचना नाकारण्यात आल्या आहेत. एकापेक्षा जास्त वेळा दाखल केलेल्या ३८ हजार ६२८ पूर्वसूचना, उशिरा दाखल केलेल्या ५१ हजार ८८८ पूर्वसूचना, नुकसान नमूद न केलेल्या १९ हजार ८९७ पूर्वसूचना मिळून एकूण १ लाख ३१ हजार ६० पूर्वसूचना विमा कंपनीने नाकारल्या आहेत.