परभणी : बिबट्याच्या भीतीने आखाडे पडले ओस, गंगाखेड तालुक्यातील स्थिती

प्रा. डाॅ. अंकुश वाघमारे
Saturday, 19 December 2020

बिबट्या हिंस्त्र प्राण्यामध्ये मोडला जातो. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात आपला मोर्चा वळवत अनेक व्यक्तींसह प्राण्यांचे बळी घेतले. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागास अथक परिश्रम करावे लागले.

गंगाखेड (जिल्हा परभणी) : मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालत १२ बळी घेतल्याची घटना ताजी असताना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात बिबट्याचा वावर सुरू असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी आखाड्यावर मुक्कामी जाणे बंद केले आहे.

बिबट्या हिंस्त्र प्राण्यामध्ये मोडला जातो. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात आपला मोर्चा वळवत अनेक व्यक्तींसह प्राण्यांचे बळी घेतले. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागास अथक परिश्रम करावे लागले. वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले. परंतु बिबट्या वेळोवेळी हुलकावणी देत राहिला. यामुळे वन अधिकाऱ्यांनी ता.१८ डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री बिबट्यास ठार मारले. बिबट्याचा मराठवाड्यातील अनेक भागात खुला वावर असल्याच्या घटना तालुक्यातील नागरिकांना पाहावयास मिळाल्या. तालुक्यातील खळी येथील दोन कुत्रे बिबट्याने ठार केले. या घटनेची शहानिशा करण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - नांदेड : रासायनिक खताच्या दरवाढीमुळे उकिरड्याचे फिटले पांग, शेणखताची मागणी वाढली! -

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचे ठसे आढळून आल्यानंतर वनविभागाच्या वतीने घटनास्थळी कॅमेरा बसवण्यात आला.या कॅमेरात २३ मे रोजी बिबट्या कैद झाला. या परिसरात वनविभागाच्या वतीने  परिसरात पिंजरा लावण्यात आला. परंतु या बिबट्या  जेरबंद करण्यास वन विभागास अपयश आले. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामध्येच तालुक्यातील महातपुरी या ठिकाणी बिबट्याची पिल्ले आढळल्याची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली व गंगाखेड तालुक्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. वन विभागाच्या वतीने ही अफवा असल्याचे सांगितले गेले परंतु तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी बिबट्याचा वावर असल्याचे गृहीत धरले व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी आखाड्यावर असलेला आपला मुक्काम टाळत सुरक्षेसाठी घरीच राहणे पसंत केले.

बिबट्याचा वावर असलेली अफवा ताजी असतानाच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रामकिशन सोडगीर यांच्या दोन शेळ्या हिंस्त्र प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली व पुन्हा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. खळी शिवारात बिबट्याचे ठसे आढळल्याचे वन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. तसेच तालुक्यातील डोंगरगाव येथे दोन शेळ्यांचा हिंस्त्र प्राण्याने घेतलेला बळी. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांसह शेतकरी दहशतीत वावरत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी शेतातील आखाडयावरील मुक्काम सध्यातरी बंद केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

येथे क्लिक करामातृवंदन योजनेतून गर्भवतींचे पोषण, ५३ हजार महिलांना २१ कोटींचा मिळाला लाभ -

गंगाखेड तालुक्यात आमच्या पाहणीनुसार बिबट्याचा वावर नाही. जर नागरिकास बिबट्याचा वावर आढळून आला तर तात्काळ आमच्या विभागास कळविण्यात यावे. बिबट्या शक्यतो मानवावर हल्ला करत नाही. परंतु नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. ज्या वन्य प्राण्यावर हल्ला केला त्याची किंमत वन विभागातर्फे पशुपालकास देण्यात येणार आहे.

- कामाजी पवार, विभागीय वन अधिकारी, परभणी.

तालुक्यातील खळी शिवारात  बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे गंगाखेड तालुक्यात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता आहे. वनविभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यानंतर या घटनेस जबाबदार कोण ? मी शेतातील आखाड्यावर मुक्कामी राहत होतो. परंतु बिबट्याच्या भीतीमुळे आखाड्यावर राहणे बंद केले आहे.

- सोपान टोले पाटील, शेतकरी, गंगाखेड.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Dew fell due to fear of leopard, situation in Gangakhed taluka parbhani news