परभणी जिल्ह्यात घरगुती सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक 

कृष्णा पिंगळे
Wednesday, 4 November 2020

सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथील गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. 

सोनपेठ ः तालुक्यातील वडगाव स्टे. येथे मंगळवारी (ता.तीन) रात्री अचानक एका शेतकऱ्याच्या घरात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंसह, रोख रक्कम, सोने, शैक्षणिक साहित्य तसेच धान्य, कापूस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

वडगाव स्टे. येथील शेतकरी ज्ञानोबा भानुदास भांगे यांच्या घरी (ता.तीन) रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. घरात आग लागल्याचे पाहताच भांगे कुटुंबियांनी घराबाहेर पळ काढला. तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू, काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

हेही वाचा - पालमच्या `त्या 42 गावांना मिळणार नुकसान भरपाई 

बुधवारी प्रशासनाकडून पंचनामा  
या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, रोख पंधरा हजार, कापूस, गहू, ज्वारी, तूर तसेच इतर संपुर्ण साहित्य जळून खाक झाले. गंगाखेड येथील अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत घरातील सर्व काही जळून खाक झाले होते. या वेळी ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू, आगीत शेतकरी भांगे कुटुंबियांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान (ता.चार) रोजी सोनपेठचे नायब तहसीलदार साहेबराव घोडके, मंडळ अधिकारी विलास वाणी, तलाठी फुलसावंगे, जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वेळी भांगे कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.  

हेही वाचा - तलाठी असलेल्या बापाने पुसले लेकीचे कुंकू : असे काय होते कारण ?

पाथरीत गस्त घालताना सापडला चोरटा 
पाथरी ः पोलिसांचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना सोन्याचे दागिने आणि घरफोडीच्या साहित्यासह चोरीच्या मोटार सायकलवरुन फिरणाऱ्या एकास पोलिसांनी (ता.चार) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बांदरवाडा रोडवरील मुलींच्या वसतिगृह परिसरात अटक केली. काही दिवसांपूर्वी शहराजवळील बांदरवाडा येथील एका शेतात दरोडा पडला होता. त्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. त्याअनुषंगाने (ता.चार) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिस उप निरीक्षक टोपाजी कोरके, पोलिस कर्मचारी सुरेश कदम आणि इतर कर्मचारी बांदरवाडा रोडवर गस्त घालत असताना सागर कॉलनी परिसरात मुलीच्या वसतिगृहाच्या लगत पोलिसांना दुचाकीवरून एक जण जात असताना दिसून आला. संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे चांदीचे २२४ ग्राम विविध दागिने व जुनी चोरीची मोटारसायकल (एमएच २१ एएफ १६२७) व घरफोडीसाठी साहित्य मिळून आले. चौकशीअंती शेख इरफान शेख अजीज (रा.मदिना पाटी परभणी ह.मु.इंदिरा नगर, पाथरी) याच्याविरूद्ध पोलिस शिपाई सुरेश कदम यांच्या फिर्यदिवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  

 
संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Parbhani district, a house was burnt to ashes in an explosion of a domestic cylinder, Parbhani News