परभणी जिल्हा; खरिपाच्या उरल्यासुरल्या आशा परतीच्या पावसाने संपुष्टात  

1111
1111

जिंतूर ः तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाचाही पिकांना फटका बसला. त्यामुळे खरिपाच्या उरल्यासुरल्या थोड्याफार आशांवर देखील पाणी फिरले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत जास्तीची भर पडली. 

शनिवारी (ता.नऊ) दुपारी सुमारे अर्धातास जोराचा पाऊस पडला. त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मेघगर्जनेसह बराचवेळ मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. तर रविवारी दुसरे दिवशी (ता.दहा) पहाटे सहा ते दहा यावेळेता धो-धो पाऊस पडला. त्यानंतरही बराचवेळ रिमझिम सुरूच होती. सलग दोन दिवस दिवसाच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे पूराच्या पाण्याने दुथडी भरून वाहले. नदीकाठच्या जमिनीत पुन्हा पुराचे पाणी शिरले. 

राहिलेल्या पिकांची आशाही संपुष्टात 
यावर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मूग, उडीद या पिकांसह हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यात हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. कापूस, तूर व इतर पिकांचीही बरीच नासाडी झाली. थोडीफार आशा उमाटावरच्या जमिनीमधील कापूस, तूर या पिकांची असताना कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यातच या दोन दिवसांच्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस खाली चिखलात गळून पडून खराब झाल्याने देवाला वाती करण्यासाठीदेखील चांगला राहिला नाही. फुलोऱ्यात आलेल्या तूरीचा फुलोरा गळून पानझड झाली. पिकांची अशी वाट लागल्याने यावर्षी तालुक्यातील खरिप पिकावरील सततच्या नैसर्गिक संकटामुळे हंगामच वाया जाण्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पिक उत्पादक चांगलाचा आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

जिंतूर शहरातही सर्वत्र पाणीच पाणी 
रविवारी सकाळी चारतास झालेल्या धुवांधार पावसामुळे दुपारी बारापर्यंत शहरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वत्र पाणीच पाणी होऊन नाल्या तुडुंब भरल्याने रस्त्यारस्त्यावरून पाणी वाहले. प्रशालेच्या व पशु चिकित्सालयाच्या मैदानात पाणी साचून दलदल झाल्याने या ठिकाणी भरविण्यात येत असलेला भाजी बाजार भरला नाही. त्यामुळे पालेभाज्या व फळभाज्या विक्रेत्यांना रस्त्यावर पथारी मांडावी लागली. दुपारी दोननंतर पुन्हा ढगांचा गडगडाट होऊन ढगाळी वातावरण निर्माण होत असल्याने आणखी पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. 

परतीच्या पावसाने सोयाबीनमध्ये पाणी 
झरी ः परिसरात (ता.दहा) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चांगला पाऊस झाला. सद्यस्थितीला शेतकऱ्याची सोयाबीन कापणी सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनवर पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच पडले. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन ढिगावर पाणीच निर्माण झाले. एक तर कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी त्रस्त असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गामुळे हरवल्याचे चित्र झरी परिसरात निर्माण झाले. परतीच्या पावसाचा कहर अनेक ठिकाणी ताडपत्रीअभावी रात्रीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना ताडपत्री घेऊन शेताकडे पळावे लागले. सद्यस्थितीला सोयाबीनची कापणी करून रब्बीसाठी ज्वारीचे रान तयार करण्याचे काम शेतकरी करत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन कापणीवर जोर लावल्यामुळे त्यातच पावसाने हजेरी झाल्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनचे ढिगारा किंवा शेतामध्ये सोयाबीन असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 


जिल्हानिहाय झालेला पाऊस 
- देवगावफाटा परिसरात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह धुवाधार पाऊस 
- सेलू तालुक्यात पावसाने कापूस, सोयाबीनचे नुकसान 
- चारठाणा परिसरात दोन तास मुसळधार पाऊस. 
- वालूर(ता.सेलू) व परिसरात मुसळधार रविवारी सकाळी मुसळधार पाऊस 
- ताडकळसला सकाळी जोरदार सरी. जनावरांना, सोयाबीन सुडी यांच्या पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची ताराबंळ. 
- सेलूत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस 
- जिंतूरला काही वेळ जोराचा तर काही वेळ मध्यम पाऊस 
- गंगाखेड शहरासह तालुक्यात दुपारी दोन पासून पाऊस 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com