esakal | परभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या समर्थकांच्या ताब्यात होती

परभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करण्यात आले असून बाजार समितीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक पदासाठी राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे कोणत्या पदाधिकार्‍यांच्या गळ्यात माळ घालणार याची उत्सुकता पदाधिकार्‍यांत दिसत आहे.

येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या समर्थकांच्या ताब्यात होती. बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांच्या नियमबाह्य कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे, ज्ञानेश्वर कचरु ताठे यांनी वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात गंभीर आरोप करण्यात आले होते. या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावरुन चौकशी समितीव्दारे अहवाल मागविण्यात आले होते. चौकशी अहवालातून तक्रारदाराने घेतलेल्या गंभीर आक्षेपास बाजार समितीचे सभापती, उपसभापती व समितीचे सर्व सदस्य जबाबदार आहेत. 

त्यांनी नेमून दिलेली कर्तव्य सक्षमरित्या पार पाडण्यास दुराग्रहाने कसूर केला आहे. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री ( विकास विनियमन ) अधिनियम १९६३ मधील कलम २९ मधील तरतुदींचे उल्लंघन करुन अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सर्व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करुन दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत बाजार समितीचे मुख्यप्रशासक म्हणून मंगेश सुरवसे, तर प्रशासक म्हणून माधव यादव ( सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सेलू ) यांनी पदभार घेतला आहे. पुढील सहा महिन्यांसाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची या बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत असल्यामुळे यामध्ये राष्ट्रवादीचे विनायक पावडे, माऊली ताठे तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष अजय डासाळकर यांची नावे समोर येत असल्याची चर्चा राष्र्टवादी काॅग्रेसच्या पदाधिकार्‍यांतून होतांना दिसत आहे.


नूकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत खुपसा ( ता. सेलू ) येथिल ग्रामपंचात राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष अजय डासाळकर यांच्या प्रयत्नामूळे बिनविरोध निवडूण आली. अजय डासाळकर हे तरुण तडफदार नेतृत्व असल्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाचा फायदा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीला होणार. असे गृहित धरुन माजी आमदार विजय भांबळे त्यांच्याच नावाचा बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी विचार करतील अशी चर्चाही दबक्या आवाजात होतांना दिसत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

loading image