
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना ता. 17 डिसेंबर रोजी दिले आहे. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचा तो क्षण समिप येऊन ठेपला आहे.
परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या जागा मिळविण्याच्या प्रक्रियेने आता वेग पकडला आहे. शहरातील व शहरालगत असणाऱ्या कृषी गोसंवर्धनाची जागा वैद्यकीय विभागास देण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात यावी अशी विनंती वजा पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना ता. 17 डिसेंबर रोजी दिले आहे. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचा तो क्षण समिप येऊन ठेपला आहे.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने पाठपुरावा केला जात आहे. मागील आठवड्यात परभणीकर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यासह खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर व आमदार मेघना बोर्डीकर या लोकप्रतिनिधीनी जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांनी यास हिरवा कंदील दिला होता. जेष्ठ नेते शरद पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करा असे सांगून आपण स्वता हा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे घेवून जाणार असल्याचे सांगितल्याने या प्रक्रियेला अधिकच गती प्राप्त झाली आहे. संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना ता. 11 डिसेंबर रोजी जागा हस्तांतरणाचे पत्र दिले होते. या पत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांनी ता. 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना एका पत्राद्वारे परभणी शहरातील व शहरालगत असणारी कृषी गोसंवर्धनची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यासाठी ही जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करावी अशी विनंती वजा पत्र दिले आहे.
हेही वाचा - प्रेरणादायी : भोसी गावची सहकार्यातुन समृध्दीकडे वाटचाल
काय आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात....
कृषी गोसंवर्धन मर्यादीत, परभणी यांच्याकडे कर्मचारी वर्ग नसल्याने या जमिनीवर त्यांचे नियंत्रण नाही. तेथे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. सदरील जमिनी या वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी प्रदान केल्यास जमिनीचा
चांगल्या कामासाठी वापर होईल व अतिक्रमणही होणार नाही. ही जमिन वैद्यकीय विभागास तातडीने हस्तांतरीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने सदर जमिनी वैद्यकीय विभागास देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरीत करावी असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
"मंगळवारी (ता. 22) उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेण्यासाठी खासदार फौजिया खान व मी स्वता मुंबई येथे जाणार आहोत. त्या आधी आम्ही उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेणार आहोत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यासाठी समिती स्थापन केल्या जातील व त्यानंतर लोकांदोलन छेडले जाईल."
- अॅड. विजयराव गव्हाणे, निमंत्रक, परभणीकर संघर्ष समिती.
संपादन- प्रल्हाद कांबळे