परभणी ग्रीनमधून पुन्हा ऑरेंजमध्ये

गणेश पांडे
शनिवार, 16 मे 2020

परभणी जिल्हा कोरोना संसर्गापासून दुर होता. सुरुवातीच्या काळात हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधीत युवक परभणी येऊन भरती झाल्याने हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये गेला होता.

परभणी : परभणी जिल्हा हा ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये बुधवारी (ता.१३) रात्री आला होता. परंतू काही तासाच्या अवधीतच गुरुवारी (ता.१४) रात्री साडे अकराला दुसरे तीन रुग्णांचा अहवाला पॉझिटीव्ह आल्याने परभणी परत ऑरेंज झोन मध्ये गेली आहे. मुंबई-पुण्याकडील नागरिक परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परत असल्याने आता या पुढे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क रहावे लागणार आहे.

परभणी जिल्हा कोरोना संसर्गापासून दुर होता. सुरुवातीच्या काळात हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधीत युवक परभणी येऊन भरती झाल्याने हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये गेला होता. त्या रुग्णावर सलग १४ दिवस उपचार करण्यात आले. त्यातून तो ठणठणीत बरा होऊन परत त्याच्या गावी निघून गेला. त्याच्या संपर्कात आलेले सर्व नातेवाईक ही निगेटीव्ह होते. त्यानंतर १९ दिवसाचा कालावधी लोटला नाही तोच मुंबईतून आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

हेही वाचा : खूनी पत्नीसह प्रियकराला कोठडी -

परत ऑरेंज झोनमध्ये
मुंबईतील अर्थररोड जेलमध्ये नोकरीस असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पत्नी व दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत जात असल्याने या कर्मचाऱ्याने पत्नी व मुलांना त्यांच्या मुळगावी शेवडी (ता.जिंतूर) येथे आणुन सोडले आहे. घरी जाण्या आधी त्यांनी स्वताची तपासणी करून घेतली होती. त्यात त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा हा परत ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. या तीन व्यक्तीच्या संपर्कात इतर १० व्यक्ती आल्या आहेत. त्यांचे ही स्वॅब घेण्यात आले आहेत.

हेही वाचा : पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंका शून्य
 

मुंबई पुण्यातून येणाऱ्यांची स्वॅब तपासणी का नाही?
कोरोना संसर्गानंतर मुंबई-पुण्यात वास्तव्यास गेलेल्या परभणी जिल्ह्यातील नागरीक आता परत येत आहेत. दोन्ही शहरात कोरोनाचा कहर मोठा असल्यामुळे भितीपोटी अनेकांनी हे दोन्ही शहर सोडून आप-आपल्या गावाकडे कुच केली आहे. असे दररोज अनेक जण परभणीत परत येत आहेत. ज्यांना जसे जमेल तश्या पध्दतीने जिल्ह्यात शिरकाव सुरु झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदीचे आदेश दिलेले असतांनाही त्याला धुडकावत लोक जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे परभणी शहरासह तालुकास्तरावर आजपर्यंत अनेक लोक आलेले आहेत. बहुतांश जणांना होम कॉरन्टाईन देखील करण्यात आले आहे. परंतू पुण्या-मुंबईतून येणाऱ्या लोकांची स्वॅब तपासणी का केली जात नाही हा देखील मोठा प्रश्नच आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Parbhani Green again to Orange Parbhani News