परभणी : अन्न परवाना काढण्यासाठी व्यापाऱ्यांची लुट,

file photo
file photo

परभणी : शासकीय कार्यालयातून काम करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात हे सर्वश्रुत आहे. परंतू आता ऑनलाईन पध्दतीने सुध्दा काम करण्यासाठी दलालांच्या माध्यमातून लूट सुरु असल्याचा प्रकार येथील अन्न व औषधी प्रशासनाच्या कार्यालयात दिसून येतो. चक्क एक परवाना काढण्यासाठी 1 हजार 200 ते 1 हजार 500 रुपयांची व्यापाऱ्यांची लुट दलालामार्फत केली जात आहे. याला याच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे निदर्शनास येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नव्याने उद्योग सुरु करणाऱ्या व्यापाऱ्यांना अन्न परवाना घ्यावा लागतो. या परवान्याची पाच वर्षासाठी 500 रुपये फिस आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागतो. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीनेच फिसची रक्कमही द्यावी लागते. परंतू शहरातील अनेक व्यापाऱ्यांना वेळे अभावी किंवा अज्ञानामुळे या ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास वेळ मिळत नाही. अश्यावेळेस या कार्यालयाच्या आसपास फिरणाऱ्या तसेच कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी लागेबांधे ठेवून असणाऱ्या दलालांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. अन्न परवाना काढण्यासाठी दलालांकडून चक्क 1200 ते 1500 रुपयांची मागणी केली जात आहे. एखाद्या व्यापाऱ्याला किंवा नव्याने उद्योग सुरु करणाऱ्यान छोट्या उद्योजकांला परवाणा काढण्याची प्रक्रिया अंत्यत किचकट असल्याचे भासवून त्याच्याकडून सर्रास पैसे उकळण्याचे प्रकार सुरु आहेत. हे प्रकार घडत असल्याचे माहिती असूनही या कार्यालयातील अधिकारी याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

दलालांचे असे ठरतात भाव

पाच वर्षासाठी अन्न परवाना काढायचा असेल तर 1200 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंतची मागणी केली जाते. या संदर्भात एका दलालाशी संपर्क साधला असता त्याने चक्क 500 रुपये परवाना फिस, 300 रुपये ऑनलाईन अपलोड करणाऱ्याचे, 200 रुपये दलालाचे तर वरील 200 रुपये हे अन्न व औषधी प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे असतात असे सांगण्यात आले. हे काम करणारे शेकडो दलाल सध्या अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाच्या अवती - भवती दिवसभर फिरत असतात. बाजारपेठेतही व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवून असतात. त्यामुळे या दलालांना कोणास परवाना काढयचा आहे याची तात्काळ माहिती मिळते.

पैसे देण्यास विरोध करणे म्हणजे महागात पडते

परवाना काढण्यासाठी पैसे देण्यास विरोध केला तर त्याची वेगळी किंमत मोजावी लागते. आता काही होत नाही परंतू नंतर काही ना काही कारणावरून किंवा कोणत्यातरी चुकीत पकडून आमच्यावर कारवाईचा बगडा उगारला जातो त्यामुळे आता पैसे गेले तरी चालतात, परंतू नंतर मोठा आर्थिक दंड परवडत नाही अशी माहिती एका व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com