
परभणी : मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या समारंभाची पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शनिवारी, ता. १७ साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय कार्यक्रम राजगोपालचारी उद्यानात उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाजवळ शासनाच्या सूचनेप्रमाणे मंत्री महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते सकाळी ८.५३ वाजता स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण व मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना व सकाळी ९ वाजता ध्वजारोहण मुख्य शासकीय समारंभ साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय समारंभात जास्तीत- जास्त नागरिकांना उपस्थित राहता यावे,
यासाठी ता. १७ सप्टेंबर रोजी वरील कालावधीत ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. बैठकीस अतिरिक्त पोलिस अधिक्षक मुम्माका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, मनपा उपायुक्त रणजित पाटील यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.