
Parbhani : आता मटकाही झाला हायटेक
सेलू : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सुरू असलेले मटका अड्डे आता नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत वाढले आहेत. मोबाइलवरून बुकिंग घेण्यासह मटक्याची रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचीही पद्धत वापरली जात आहे. अनेक ठिकाणी भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम मटका अड्डे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
मोबाइलवरून मटक्याचे आकडे लावण्याची सुविधा बुकींनी सुरू केली आहे. यासाठी मटका खेळणाऱ्या नेहमीच्या ग्राहकांना ठरावीक मोबाइल नंबर पुरवले जातात. हे नंबर ठरावीक दिवसांनी बदलतात. मटका लागलेल्या व्यक्तीला मोबाइलवरूनच माहिती पुरवली जाते. विशेष म्हणजे मोठ्या रकमेसह खेळणाऱ्यांना बँकिंग सुविधाही पुरवली जात आहे.
मटका खेळणाऱ्यांना रक्कम घेण्यासाठी जावे लागू नये, यासाठी बुकीकडे असलेल्या कार्यकर्त्यांच्या खात्यावरून मटक्याची रक्कम खेळणाऱ्यांच्या नावावर ऑनलाइन वर्ग केली जाते. या प्रकारामुळे लोकांच्या नजरेत न येताही मटका खेळता येत असल्याने तरुण आणि पांढरपेशा वर्गही मटक्याकडे आकर्षित होत आहे.
कोणत्या दिवशी मटक्याचा कोणता आकडा निघेल याचे भाकीत करणारीही एक यंत्रणा सक्रिय आहे. नव्याने खेळण्यासाठी येणाऱ्यांना ही यंत्रणा मार्गदर्शन करते. खेळणाऱ्यांना मटक्याची चटक लागल्यानंतर कमिशनवर संभाव्य आकडे पुरवले जातात. लागणाऱ्या रकमेतील दहा ते पंचवीस टक्के रक्कम देण्याच्या बोलीवर संभाव्य आकडे सांगितले जातात. संध्याकाळी शाहू टॉकीज परिसरात काही वेळ थांबल्यास या यंत्रणेचा अनुभव येतो.
सर्वांकडे मोबाईल झाला असल्याने सर्वांचे मोबाइल हाताळणे शक्य नाही; तरीही आम्हाला माहिती मिळताच आम्ही संबंधितावर कारवाई करू.
- रावसाहेब गाडेवाड, पोलिस निरीक्षक, सेलू