परभणी : कुटुंब नियोजनात पुरुष पिछाडीवर, वर्षभरात दोन पुरुषांची तर २१६ महिलांची नसबंदी

विलास शिंदे
Monday, 4 January 2021

तंत्रज्ञानाच्या युगात आजही बुरसटलेल्या विचारांचा पगडा कायमच आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूक झालेली पुरुष मंडळी मात्र जून्याच विचारधारांना धरत आहेत. कुटूंब नियोजनाच्या बाबतीत पुरूष सातत्याने महिलांनाच समोर करतात.

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावरुन कुटुंब नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात येतो. मात्र बुरसटलेल्या गैरसमजातून तालुक्यामध्ये वर्षभरात केवळ दोन पुरुषांनीच कुटुंब नियोजन शस्रक्रिया केली असल्याने पुरूष कूटुंब नियोजनात पिछाडीवरच असल्याचे दिसत आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात आजही बुरसटलेल्या विचारांचा पगडा कायमच आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूक झालेली पुरुष मंडळी मात्र जून्याच विचारधारांना धरत आहेत. कुटूंब नियोजनाच्या बाबतीत पुरूष सातत्याने महिलांनाच समोर करतात. पुरूषांची कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया सोपी असतांनाही परंपरेनूसार महिलांनाच त्या शस्रक्रियासाठी समोर येण्याची प्रथा कायमच आहे. शासनाने राजकीय तथा शासकीय नोकरीत काम करण्यासाठी केवळ दोन अपत्य असण्याची सक्ती केली आहे. तसेच शासकीय कार्यालयातून कुटुंब नियोजन करण्यासाठी महिला व पुरूषांना वारंवार समुपदेशन केले जात असले तरी यासाठी महिलांच पुढे यावे लागते. तालुक्यामध्ये ( ता.०१ ) एप्रिल ते ( ता.३१ ) डिसेंबर २०२० दरम्यान उपजिल्हा रूग्णालयात- २१६ महिलांची कुटूंब नियोजन नसबंदी शस्रक्रिया करण्यात आली आहे.

हेही वाचापरभणी : महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे दारे उघडणाऱ्या सावित्रीच्या खऱ्या लेकी

या वर्षभराच्या कालावधीमध्ये केवळ दोन पुरूषांनीच कुटुंब नियोजन शस्रक्रिया केली आहे. शासन स्तरावरून कुटूंब नियोजन शस्रक्रिया करणार्‍या पूरुषांना एक हजार ४०० रुपये मदत देण्यात येते. तर महिलांना केवळ सहाशे ते २५० रूपये एवढी किरकोळ आर्थिक मदत देण्यात येत असली तरी महिलांनाच या नसबंदीसाठी पुढे केले जात असल्याने समाजात पुरुषांचे बुरसटलेले विचार कायमच आहेत.

पुरूष नसबंदी सोपी...

महिला कुटुंब नियोजन शस्रक्रिया गुंतागुंतीची असते. तसेच शस्रक्रिया केल्यानंतर आठवडाभर महिलांना रूग्णालयात उपचारासाठी रहावे लागते. या उलट पुरूष नसबंदी सोपी असून केवळ एक ते दोन तासात पुरूषांना रूग्णालयातून सुट्टी मिळते. तरी सुध्दा काही गैरसमाजामूळे पुरुष नसबंदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. तसेच आरोग्य विभागाकडून पुरूष नसबंदीसाठी जनजागृती करण्यात येते. तरीसुध्दा पुरूष नसबंदीसाठी उदासीन असल्याचे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय प्रभारी अधिक्षक डाॅ.संजय हरबडे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Men lag behind in family planning, sterilization of two men and 216 women during the year parbhani news