
Parbhani : मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा व अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पावसामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जून महिन्यापासून कधी जास्त पावसाने तर कधी एक महिना खंड दिलेल्या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागे
उभे रहायला पाहिजे होते. परंतु, महसुल व कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आता शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्हाभरात ज्या ज्या मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. ती सर्व यंत्रे बंद आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनीला मदत करत केवळ ८ मंडळाचीच अग्रीमसाठी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात १०० मिलिमीटर पाऊस झाला असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पीकविमा मंजूर व्हायला पाहिजे होता. मात्र, जिल्हा प्रशासन पंचनामे करण्यातच वेळ घालून नेत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात पीकविमा व हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात किशोर ढगे, केशव आरमळ, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, रामप्रसाद गमे, पंडित अण्णा भोसले, बालकिशन चव्हाण, रामेश्वर आवरगंड, बाळासाहेब घाटूळ, उद्धव जवंजाळ, पिना पाटील, प्रसाद गरुड, नवनाथ दुधाटे, प्रेम देसाई, विष्णू दुधाटे, मंचकराव शिंदे आदींनी सहभाग नोंदविला होता.