परभणी महापालिका ; १२३ कोटीच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी

manapa
manapa

परभणी : महापालिकेच्या सन २०२१- २२ या १२३ कोटीच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंगळवारी (ता.३०) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आली. या वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार, लेखा व वित्त अधिकारी डॉ.प्रभाकर काळदाते, सहाय्यक भगवान यादव, नगरसचिव विकास रत्नपारखी आदींची उपस्थिती होती. या सभेत स्थायी समितीने सादर केलेल्या सन २०२१ २२ च्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. 

महसूली उत्पन्न १३२ कोटी ४० लक्ष 
अंदाजपत्रकात सन २०२१ २२ चे महसूली उत्पन्न १३२ कोटी ४० लक्ष व भांडवली उत्पन्न ४६६ कोटी ४० लक्ष मिळण्याचा अंदाज आहे. सुरुवाती शिल्लक १६ कोटी सात लक्ष असून एकूण वार्षिक उत्पन्न ६३१ कोटी सात लक्ष रूपये मिळण्याचा अंदाज या अंदाजपत्रकात वर्तवण्यात आला आहे. तर सन २०२१-२२ मध्ये महसुली खर्च १०५ कोटी २१ लक्ष व भांडवली खर्च ३७२ कोटी ६६ लक्ष रुपये होण्याचा अंदाज आहे एकूण खर्च ५०७ कोटी ९६ लक्ष होणे अपेक्षित असून जमा व खर्चाचा ताळमेळ लावल्यास १२३ कोटी दहा लक्ष शिलकीच्या अंदाजपत्रकास या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

महसुली उत्पन्नात मालमत्ता कराचा मोठा वाटा 
महसुली उत्पन्नात मालमत्ता कराचा मोठा वाटा महापालिकेच्या महसुली उत्पन्नात मालमत्ता कराचा मोठा वाटा असून सन २०२१- २२ मध्ये ४७ कोटी मालमत्ता कर वसूल होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर मोबाइल टॉवरच्या भाड्यातून पाच कोटी, इमारत भाड्यातून १५ कोटी, नगर रचना विभागातून दोन कोटी ४० लक्ष साफसफाई करातून दोन कोटी, पाणी पट्टीतून १३ कोटी २९ लक्ष उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. तर या महसूल उत्पन्नातून विविध विकास कामावर खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठ्यावर ३३ कोटी ९३ लाख खर्च होण्याचा अंदाज आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते साठी १६ कोटी ७५ लक्ष, सेवा निवृत्ती वेतन व इतर उपदानावर दोन कोटी ४० लक्ष, रोजंदारी आस्थापनांवर ५३ लक्ष, सामान्य व प्रशासन खर्च चार कोटी ७७ लाख, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी नऊ कोटी ९३ लक्ष, साफसफाई वर दहा कोटी दोन लक्ष, दवाखाने व रुग्णालये साठी चार कोटी ७३ लाख, सार्वजनिक बांधकामासाठी पाच कोटी ९३ लक्ष रुपये क्रीडा क्षेत्रासाठी ९२ लाख रुपये प्रामुख्याने खर्च केले जाणार आहेत. 

भांडवली खर्चातून होणार विकास कामे 
शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांसाठीचे अनुदान व काही मनपा निधीतून भांडवली खर्चाची जुळवाजुळव करण्यात आली. त्यामध्ये नटराज रंग मंदिरच्या विस्तारीकरणासाठी सात कोटी, दरवर्षीप्रमाणे हाजी हाउस, विपश्यना केंद्र व वारकरी निवासासाठी प्रत्येकी तीन कोटी, जलतरणिकेच्या आधुनिकीकरणासाठी एक कोटी, तीन ओपन जिमसाठी पंधरा लक्ष, खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी एक कोटी रुपये अधिक खर्च मनपा निधीतून केला जाणार आहे. तर शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून पंधराव्या वित्त आयोगातील कामांसाठी २५ कोटी, नागरी दलित वस्ती सुधार योजनेण्साठी, नागरी दलित्तोत्तर विकास योजनेसाठी आठ कोटी, मूलभूत सोयी सुविधांसाठी ३५ कोटी, नगरोत्थान योजनेसाठी २०० कोटी, अल्पसंख्यांक बहुल विकास क्षेत्रासाठी २० कोटी, रमाई घरकुल योजनेसाठी १७ कोटी, अपारंपारिक ऊर्जा सौर ऊर्जेसाठी २० कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी पंचवीस कोटी ५० लक्ष, अमृत योजनेसाठी वीस कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी दहा कोटी व घनकचरा खत निर्मिती प्रकल्पासाठी १८ कोटी खर्च अपेक्षित आहे. 

महापालिकेला ७७ कोटीचे देणे 
महापालिकेला ७७ कोटी रुपयांचे देणे देखील आहे. त्यामध्ये महापालिकेने घेतलेल्या काही कर्जाचा देखील समावेश आहे. त्यामध्ये आयुर्विमा कर्ज तीन कोटी पाच लक्ष, खुल्या बाजारातून घेतलेले एक कोटी पाच लक्ष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे देणे पंचावन्न कोटी ८० लक्ष, पुर्णा पाटबंधारे विभागाचे आठ कोटी ८० लाख, विद्युत पथदिव्यांचे तीन कोटी रुपये देणे आहे. 

यांनी केले नियोजन 
हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आयुक्त देविदास पवार यांच्या नियोजनाखाली तयार झाला. उपायुक्त प्रदीप जगताप, देविदास जाधव, मुख्यलेखाधिकारी डॉ.काळदाते, राठोड, भगवान यादव, मंजूर अहेमद, नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्या सहकार्याने अर्थसंकल्प तयार झाला. ऑनलाइनसाठी सभेसाठी अदनान कादरी, विकास रत्नपारखे, भगवान यादव, समिंद्रे, पालकर, सुमित दरक यांनी परिश्रम घेतले. 

महापालिकेच्या कारभारावर राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज 
अर्थसंकल्पीय सभा ही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असते. परंतू, ही सभा महापालिकेच्यावतीने ऑनलाइन घेत आपल्या गलथान कारभाराचे उदाहरण दिले आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक इम्रान हुसैनी यांनी केला आहे. इम्रान हुसैनी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कोरोना सारख्या अडचणीच्या काळात महापालिका प्रशासन नगरसेवकांना सहकार्य करत नसल्याचे म्हटले आहे. नगरसेवकांच्या मागण्याकडे आयुक्त दुर्लक्ष करत आहेत. आयुक्त लवकर भेट देत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे. शहरात मुलभूत सुविधा देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अर्थसंकल्पाची सभा ही ऑफलाइन घेण्याची आमची मागणी होती. परंतू, तसे झाले नाही. याचा आम्ही निषेध करतो असेही इम्रान हुसैनी यांनी पत्रकात म्हटले आहे.

संपादन - राजन मंगरुळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com