परभणी महापालिका जानेवारीत अतिक्रमण हटाव मोहिम राबवणार

सकाळ वृतसेवा 
Thursday, 31 December 2020

परभणी शहरातील सर्वदुर रस्त्यांना घातलेल्या अतिक्रमणांची आता विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दखल घेतल्याची माहिती असून जानेवारी महिण्यात महापालिका अतिक्रमण हटाव मोहिम राबवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

परभणी ः शहरातील सर्वदुर रस्त्यांना घातलेल्या अतिक्रमणांची आता विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दखल घेतल्याची माहिती असून जानेवारी महिण्यात महापालिका अतिक्रमण हटाव मोहिम राबवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

महापालिकेच्या वतीने साधारणतः पाच वर्षापुर्वी तत्कालीन आयुक्त अभय महाजन यांनी अतिक्रमण हटाव मोहिम राबवली होती. त्यामध्ये त्यांनी विद्यानगर, शिवाजी चौक, गुजरीबाजार, स्टेशन रोड, वसमत रोड, जिंतुर रोड, गंगाखेड रोड, ग्रॅंड कॉर्नर, खंडोबाबाजार, डनलप रोड, प्रशासकीय ईमारत परिसर आदी रस्त्यावरील कच्छी-पक्की अतिक्रमणे जमिनदोस्त केली होती. तत्कालीन उपायुक्त दिपक पुजारी व रणजीत पाटील यांनी देखील त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मात्र गेल्या पाच वर्षात महापालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणांकडे अक्षम्य दुर्लक्ष केली. 

अतिक्रमणांचे पेव फुटले 
हळूहळू पाय पसरवत अतिक्रमण धारकांनी आता शहरातील रस्त्यावरच ठाण मांडले असून त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातमध्ये शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जिंतुर रोडवरील विसावा फाट्यापासून वसमत रस्त्यावरील खानापुर फाट्यापर्यंत अक्षरशः रेलचेल आहे. प्रशासकीय यंत्रणाच निष्क्रीय झाल्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावले असून प्रमुख रस्त्यासह शहर अंतर्गत रस्त्यांवर देखील कच्ची, पक्की अतिक्रमणांचे पेव फुटले आहेत. 

हेही वाचा - औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका -

लोकसेवकांच्या वरदहस्ताने शहर विद्रुप 
या अतिक्रमणधारकांवरील लोकसेवकांच्या वरदहस्तामुळे शहर विद्रुप झाले आहे. गावठाणात अगोदरच अरुंद असलेले अनेक रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील साईडपट्टे अतिक्रमणांनी व्यापली आहेत. शंभर फुटांचा हा राष्ट्रीय महामार्ग ६०-७० फुटांचा अथवा त्यापेक्षा कमी झालेला असून पालिका, शहर वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - नांदेड : मानसिंगवाडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार

विभागीय आयुक्तांनी घेतली दखल 
परभणीचे भूमिपुत्र असलेले विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी वेळोवेळी शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. नळजोडणी, प्लास्टींक बंदी, रस्त्यांचा दर्जा यासाठी त्यांनी वेळोवेळी कान टोचले तसे विकासनिधीसाठी देखील पाठपुरावा केला आहे. आता या अतिक्रमणांची देखील त्यांनी दखल घेतली असून महापालिकेच्या आयुक्तांना सूचना केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

विभागीय आयुक्तांच्या सूचना 
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी अतिक्रमणांसंबंधी सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने मोहिमेचे नियोजन केले असून जानेवारी महिण्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही मोहिम राबवली जाणार आहे. 
- देविदास पवार, आयुक्त, महापालिका. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Municipal Corporation will launch an anti-encroachment drive in January, Parbhani News