Parbhani : सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani

Parbhani : सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

परभणी : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासाठी तर घंटागाडी एजन्सीने थकबाकी देण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे एैन सणासुदीच्या दिवसात शहर स्वच्छतेसह अन्य प्रश्न निर्माण होणार असून, हा आंदोलनाचा तिढा सोडविण्यासाठी नूतन प्रशासकासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

शहर महानगरपालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने सोमवारपासून सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. संघटनेने पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. तत्पूर्वी महापालिका आयुक्त तथा प्रशासन तृप्ती सांडभोर यांना निवेदन दिले आहे. संघटनेने यापूर्वी दोन वेळेस संप पुकारला होता. तत्कालीन प्रशासनाने आयोग लागू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

आदेश निर्गमित करुनही सातवा वेतन लागू होत नाही. यातच श्रीमती सांडभोर यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता दिवाळी सणापूर्वी वेतन व डीएची थकीत रक्कम, फेस्टिव्हल अॅडव्हॉन्स देण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या आंदोलनात महापालिकेतील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले आहेत.

घंटागाडी चालकांचेही कामबंद आंदोलन

शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी व रस्त्यावरील कचरा उचलून तो डंपिंग ग्राउंडवर पाठविण्यासाठी पालिकेने एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सीच्या सर्व वाहन चालकांनी वेतन न मिळाल्यामुळे रविवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्या व अन्य वाहने थप्पीला लागली आहेत. या एजन्सीचे गत साडेचार महिन्यांपासूनचे जवळपास दोन कोटी ८० लाख रुपये थकल्याचे सांगितले जात आहे. एजन्सी वाहन चालकांना वेतन देऊ शकत नसल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

टॅग्स :ParbhaniEmployeesMovement