esakal | परभणी : रेमडेसिविर इंजेक्शन विकणाऱ्या परिचारिकेसह एकास अटक

बोलून बातमी शोधा

परभणी पोलिस

परभणी : रेमडेसिविर इंजेक्शन विकणाऱ्या परिचारिकेसह एकास अटक

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः शासकीय कोविड सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन चोरुन ते काळ्या बाजारात चढ्या भावाने विकणाऱ्या एका परिचारिकेसह अन्य एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यांस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 20) सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन 75 हजार रुपयांसह दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे.

परभणी शहरात कोरोना विषाणु संसर्गामुळे लोक हैराण झाले आहेत. या संसर्गावर उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी त्याचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी जिवाचा आटापिटा करत आहेत. याचा

गैरफायदा घेवून अनेक जण या इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याच्या घटनाही समोर येतांना दिसत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस अधिक्षक जयंत मीना व अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बेकायदेशिर विक्री वर छापा मारण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखासह अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचे पथक तयार केले होते.

हेही वाचा - पोतरा येथे चैत्रशुध्द एकादशीपासून हनुमान जयंती पर्यंत पवित्रेश्वर महादेवाची यात्रा असते. आमल्या बारशीची ही यात्रा सर्वदूर परिचित आहे

या पथकाला मंगळवारी (ता. 20) दुपारी रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. इंजेक्शनची बेकायदेशिर विक्री करणाऱ्या व्यक्तीला भेटून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांने त्याच्याकडे आपल्या नातेवाईकाला कोरोना झाला असून तो गंभीर असल्याचे सांगितले. आपल्याला इंजेक्शनची नितांत गरज असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीने इंजेक्शनसाठी 15 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. दोन इंजेक्शनचे 30 हजार रुपये ठरले. त्यानुसार त्या व्यक्तीने बेलेश्वर मंदीर, नांदखेडा रोड येथे इंजेक्शन नेण्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोलाविले. पोलिस कर्मचारी संतोष सानप हे ठरल्याप्रमाणे नांदखेडा रोड परिसरात गेले. त्या ठिकाणी आगोदर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी दबा धरुन बसले होते. त्यावेळी इंजेक्शन संदर्भात बोलत असतांनाच त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याचे नाव दत्ता शिवाजी भालेराव (वय 21, नर्सिंग स्टॉफ, डेंटल कॉलेज, पाथरी रोड परभणी) असे आहे.

जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचाही सहभाग

जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका निता केशव काळे या जिल्हा परिषद कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्या जिल्हा परिषद कोविड सेंटरमधून हे इंजेक्शन चोरून घेत होत्या. व त्या दत्ता भालेराव यास 12 हजार रुपयांना विकत असे. पोलिसांनी निता काळे यांच्या घरी झडती घेतली असता, त्या ठिकाणी 75 हजार रुपये रोख रक्कम ही पोलिसांना सापडली. या परिचारिकेने या कोविड सेंटरमधून आता पर्यत सात इंजेक्शन चोरल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. या परिचारिकेला ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी केला सापळा यशस्वी

हा सापळा अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. यात सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार संतोष सिरसेवाड, पोलिस कर्मचारी श्री.जक्केवाड, मधूकर चट्टे, श्री.तुपसुंदरे, श्री.खुपसे, श्री.चव्हाण, मोबीन, अझहर शेख, दिलावर खान, श्री. आव्हाड, श्री.निळे यांनी केली.

परभणी पोलिस दलाकडून जनतेला आवाहन करण्यात येते की, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्यास त्याची माहिती (9673888868 व 9422644745) यावर द्यावी.

- जयंत मीना, पोलिस अधिक्षक, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे