esakal | पोतरा येथील पवित्रेश्वर महादेवाची आमल्या बारशीची यात्रा दुसऱ्यांदा कोविडमुळे रद्द

बोलून बातमी शोधा

Pavitreshwar Mahadev

आमल्या बारशीची ही यात्रा सर्वदूर परिचित आहे.

पवित्रेश्वर महादेवाची आमल्या बारशीची यात्रा दुसऱ्यांदा कोविडमुळे रद्द
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील पवित्रेश्वर महादेवाची आमल्या बारशीची शुक्रवारपासून (ता. २३) सुरु होणारी यात्रा कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रद्द करण्यात आली आहे. मागच्या वर्षी देखील कोविडमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. पोतरा येथे चैत्रशुध्द एकादशीपासून हनुमान जयंती पर्यंत पवित्रेश्वर महादेवाची यात्रा असते. आमल्या बारशीची ही यात्रा सर्वदूर परिचित आहे.

हेही वाचा: संचारबंदीत ७.३५ लाख कुटुंबाना मिळणार मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ

येथील महादेवाला शेतकरी बैलजोड्या घेऊन मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालतात. यात जिल्हासह परभणी, नांदेड, अकोला आदी जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतात. तसेच कावड देखील घेऊन येतात. येथे दरवर्षी गुडीपाडव्यापासून काठीचे मानकरी रामराव मुलगीर यांच्या घरी काठी उभारुन तीची 12 दिवस पूजा केली जाते. चैत्रशुध्द एकादशीला विठ्ठल मंदिरासमोर भाविकांच्या दर्शनासाठी कावड उभी केली जाते. येथे काठीची पूजा, दर्शन कार्यक्रम तसेच जागरण कार्यक्रमासह मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. बारशीच्या 12 दिवसात उपवास केले जातात. तसेच या 12 दिवसात लग्नकार्य केले जात नाहीत.

हेही वाचा: वाई बाजारात संचारबंदी लागू मात्र देशी दारू विक्री नियम मुक्त

यात्रेसाठी लेक जावाई यांनी बोलावण्याची परंपरा आहे. तसेच कामानिमित्त व नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेले गावकरी यात्रेसाठी गावी येतात. चैत्रातील पौर्णिमेला हनुमान जयंतीला यात्रेची सांगत केली जाते. त्यानिमित्ताने घरोघरी आमलीचा प्रसाद केला जातो. ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र मागच्या वर्षी पासून कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यात्रा महोत्सव रद्द केल्याने यावर्षी देखील पवित्रेश्वर महादेवाची शुक्रवारपासून सुरू होणारी आमल्या बारशीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.