esakal | परभणी : शंभर वर्षाच्या आजोबाने नऊ दिवसात कोरोनाला हरविले

बोलून बातमी शोधा

परभणी कोरोना
परभणी : शंभर वर्षाच्या आजोबाने नऊ दिवसात कोरोनाला हरविले
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : वयाची शंभरी गाठली असलीतरी सकारात्मक विचार व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात करु शकतो हे शंभर वर्षाच्या आजोबाने कोरोनाला नवू दिवसात हरवत सिध्द करुन दाखवले. मारोतराव बाजीराव घुगे असे या आजोबाचे नाव आहे.

कोरोनाला हरवून घरी येताच कुटुंबियांनी त्यांचे स्वागत करुन आनंदोत्सव साजरा केला. तालुक्यातील टाकळखोपा येथील शंभर वर्षे वयाचे मारोत घुगे यांना मागील आठवड्यात एकेदिवशी साधारण तापाची कणकण जाणवू लागली. तेंव्हा डॉक्टर असलेले त्यांचे चिरंजीव शिवाजी घुगे यांनी घरीच चिकित्सा करुन त्यांना औषधोपचार केले. परंतु तीनचार दिवस झालेतरी ताप कमी होत नव्हता. शिवाय त्यांची ऑक्सिजन पातळीसुध्दा कमी झाली होती. प्रकृतिही बरीच खालावली होती. त्यामुळे घरचे सर्वजण काळजीत पडले असताना डॉ. शिवाजी घुगे यांना वडिलांना कोरोनाची लागण झाली असावी अशी शंका आल्याने त्यांनी त्यांना परभणी येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. मुरलीधर सांगळे यांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या. त्यातून त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घरच्यांना घोर लागला. डॉ. सांगळे यांनी त्यांना धीर देत रुग्णावर उपचार केले. नवू दिवसांच्या उपचारानंतर प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शंभर वर्षाचे मारोतरावने कोरोनावर विजय मिळवला.

हेही वाचा - काळजी घ्या पण काळजी करु नका असा रुग्ण, नातेवाईकांना जिव्हाळ्याचा सल्ला देतानाच येत्या दहा दिवसांत अख्या महाराष्ट्रातून कोरोना विषाणू हद्दपार होणार

घरच्यांनी आनंद व्यक्त करत औक्षण करुन त्यांचे स्वागत

कोरोनाला घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास कोरोना शंभर टक्के बरा होतो.

- मारोतराव घुगे

ताप आल्यानंतर लवकर रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावे. तसेच अहवाल येईपर्यंत क्वारंटाइन राहावे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोवीड हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे.

- डॉ. शिवाजी घुगे

संपादन- प्रल्हाद कांबळे