
येत्या 15 जानेवारी रोजी जिल्हयात ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया घेतली जाणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे.
झरी (जिल्हा परभणी) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस, अग्नीशमन व आरोग्य यंत्रणा सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी झरी (ता.परभणी) येथे मंगळवारी (ता.12) रंगीत तालीम घेण्यात आली. खऱ्या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांची कशी तत्परता असते हे यावरून झरीकरांना अनुभवावयास मिळाले.
येत्या 15 जानेवारी रोजी जिल्हयात ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया घेतली जाणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. गाव म्हटल्यानंतर तेथील निवडणुकीत होणारा दंगा व इतर भांडणे लक्षात घेवून पोलिस अधिक्षक जयंतकुमार मीना व अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमुक्का यांनी पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी मंगळवारी ही रंगीत तालीम घेतली. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता पोलिस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याला झरी येथे दोन गटात दंगल झाली असून जाळपोळ सुरु असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - एसटी बंदमुळे विद्यार्थी व ग्रामीण प्रवाशी अवैध वाहतुकीकडे; जीव मुठीत घेऊन प्रवास
या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी परभणी ग्रामीण, बोरी, चारठाणा, बामणी, जिंतूर, ताडकळस, दैठणा यांच्यासह परभणीतील कोतवाली, नानलपेठ पोलिस ठाण्यासह अग्नीशमन दलास सतर्क होऊन झरी येथे पोहचण्याचे आदेश देण्यात आले. केवळ 10 ते 15 मिनीटाच्या आता ही सर्व यंत्रणा झरी गावात पोहचली. पंरतू ही रंगीत तालीम असल्याचे परभणी ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी प्रदीप काकडे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गावात अचानक फौजफाटा व गावकऱ्यांची पळापळ
गावात पोलिसांचा फौजफाटा, अग्नीशमन दलाच्या गाड्या पाहून व रुग्णवाहीकांचे सायरन ऐकून गावकरी मात्र प्रचंड भेदरले. काय झाले कोणासही समजले नाही. एकमेकास दूरध्वनीद्वारे विचारपूस करू लागले. परंतू जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी ही रंगीत तालीम असल्याचे सांगितल्यानंतर गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
संपादन- प्रल्हाद कांबळे