esakal | परभणी : सकारात्मक...! सततच्या संचारबंदीमुळे गृहउद्योग बहरले; महिलांच्या हाताला वाढले काम

बोलून बातमी शोधा

महिला गृहउद्योग
परभणी : सकारात्मक...! सततच्या संचारबंदीमुळे गृहउद्योग बहरले; महिलांच्या हाताला वाढले काम
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः गेल्या एकवर्षापासून जिल्ह्यात सातत्याने संचारबंदी, टाळेबंदीचे आदेश येत असल्याने बाजारपेठ प्रदिर्घ कालावधीसाठी बंद आहे. त्यामुळे महिलांच्या छोट्या गृहउद्योगाला चांगले दिवस आले आहेत. घरपोच साहित्य पोहचविले जात आहे. परिणामी महिलांच्या हाताला काम वाढले असले तरी त्यांच्या हातात चार पैसे येत असल्याने त्यांच्या उत्पन्ना स्त्रोत सुरु झाला असल्याचे हि दिसत आहे.

कोरोना विषाणु संसर्गामुळे अवघ्या जगातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अनेक मोठ - मोठे व्यवसाय बंद आहेत. परिणामी काही व्यवसायांचे दिवाळे निघाले आहे. याचा विपरित परिणाम समाजमानावर दिसून येत आहे. मागील वर्षी सलग तीन महिणे बाजारपेठ बंद होती. त्यानंतर दिवाळीच्या आसपास कुठेतरी बाजारपेठ पुन्हा उभारी घेत असतांनाच कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली. त्यात परभणी जिल्ह्यात तर कोरोना संसर्गाचा कहरच झालेला आहे. दररोज मृत्यु पावणाऱ्यांची संख्या ही कमालीची वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कडक निर्बंध लावावे लागत आहेत. राज्य शासनाने लागू केलेली अंशत: टाळेबंदी व त्यात जिल्हा प्रसासनाची संचारबंदी यामुळे व्यवसाय पुन्हा बंद पडले आहेत. परंतू या दिवसात एक सकारात्मक हालचाल ही प्रकर्षाने समोर येत आहे. ती हालचाल म्हणजे महिला गृह उद्योगांची. परभणी जिल्ह्यात शेकडो गृह उद्योग चालतात. हे उद्योग चालविणाऱ्या महिलांनी कोरोनाला संधी समजत त्याचे सोने केले. एकीकडे दुकाने बंद असल्याने वस्तू मिळणे आवघड असतांना दुसरीकडे गृह उद्योग चालविणाऱ्या महिलांकडून थेट घरपोच वस्तू, साहित्य, पदार्थ पोहचविण्यास सुरुवात केल्याने त्याला मागणी वाढली आहे.

महिलांकडून तंत्रज्ञानाचा ही योग्य वापर

ऐरवी चार भिंतीच्या आड राहून चुल आणि मुल सांभाळणाऱ्या अनेक महिलांनी या कोरोना काळात स्वताची योग्यता सिध्द केली आहे. अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देत त्यातून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले आहेत. परंतू हेही चार भिंतीच्या आतच. व्हॉटसअप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करत या महिलांनी स्वताच्या उद्योगांना प्रगतीचे पंख दिले आहेत. एरवी तासतास मोबाईलवर वेळ वाया घालविणाऱ्या महिलांना बदलाची पाऊले ओळखत त्यातून प्रगती साधली आहे.

अनेकींनी उघडले युट्युब चॅनल

जिल्ह्यातील अनेक महिलांनी तर स्वताची रेसिपी जगजाहिर करून ती इतरांनी कळावी यासाठी फावल्या वेळेचा सदुपयोग केला आहे. अनेक महिलांनी स्वताचे युट्युब चॅनल सुरु करून त्याद्वारे रेसिपी शिकविण्यास सुरुवात केली आहे. जेणे करून या बंदच्या काळात घरी बसून कंटाळलेल्या महिलांनाही त्याद्वारे नव नविन रेसिपी शिकण्यास मिळत आहे. या युट्युब चॅनलचा ही फायदा घेवून काही गृह उद्योजिका त्यांचे व्यवसाय करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे