Parbhani : परतीच्या पावसाने सोयबीन पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jintur

Parbhani : परतीच्या पावसाने सोयबीन पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत

परभणी : जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी (ता. ११) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती.

पण, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.

शेंगांना कोंब फुटण्याची भीती

सोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत. काहींना मजुराअभावी सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे शेतातच असलेल्या या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटू शकतात. तसे झाले तर काहीच पीक हातात येणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जिंतूर शहरात ४५ मिनिटे मुसळधार

जिंतूर : एक दिवसाच्या विश्रांतिनंतर मंगळवारी दुपारी साडेतीननंतर शहर व परिसरात मेघगर्जनेसह ४५ मिनिटे जोराचा पाऊस झाला. त्यानंतरही काहीवेळ रिमझिम सुरूच होती.

पाच सप्टेंबरपासून तालुक्यातील आठही मंडळात रोज पाऊस जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी एक दिवस पावसाने विश्रांती घेतली. तोच मंगळवारी पुन्हा पाऊस झाला. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे काहीवेळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. शेतीच्या कामांना व्यत्यय आला. शहरात नगरपरिषदेची पाणीवितरण व्यवस्थेचे वेळापत्रक कोलमडले असल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांनी सांडपाण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपयोग घेत पाणी साठवून ठेवले.

वालूर ः फळबागेचे नुकसान

वालूर : परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीनसह भाजीपाला व फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली.

शेतात सोयाबीनची काढणी सुरू असल्याने मोठी तारांबळ उडाली. विजेचा लखलखाट व मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पावसामुळे भीतीदायक वातावरण झाले होते. शेतातील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंज्यांमध्ये पाणी घुसले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापूस पीकही लवंडले. भाजीपाला व फळबागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

वालूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या प्रवासात पावसाने हाहाकार केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

झरी ः तोंडी आलेला घास गेला

झरी : परिसरात परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. हाता-तोंडाशी आलेला घास गेला. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. यामुळे खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणेही अवघड झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई अनुदान जाहीर करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

गंगाखेड ः पावसाची रिमझिम

गंगाखेड : पावसाळ्याच्या प्रारंभापासून ते परतीच्या पावसापर्यंत पावसाने गंगाखेड तालुक्यात कुठल्या भागात अतिवृष्टी तर कुठे उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मंगळवारी तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान तर रब्बीच्या पिकासाठी थोड्या प्रमाणात दिलासा दिला.

खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने तालुक्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे उघडीत दिली. परतीच्या पावसाने ऐन सोयाबीन काढणीच्या वेळेस हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील काही भागातील सोयाबीनचे नुकसान झाले तर रब्बीच्या पिकासाठी परतीच्या पावसाची हजेरी दिलासादायक ठरली. ज्या ठिकाणी कापूस काढणीस आलेला आहे. त्या कापसाचे मात्र नुकसान होणार आहे.

राणीसावरगाव ः शेतकरी हवालदिल

राणीसावरगाव ः दोन तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहेत. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले. पेरणीच्या सुरुवातीला जास्त पावसामुळे पिके करपली होती. आता परत सारखा पाऊस होत असल्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन भिजण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, मुगाच्या ऐन कापणीवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

माझी दोन एकर शेती आहे. माझ्या कुटुंबाचा पूर्णतः शेतीवर उदरनिर्वाह आहे. यावर्षी मुरमाड जमीन असल्याने सोयाबीन वाळून गेले. जे थोडेफार पीक होते. त्याचे पावसाने नुकसान झाले. प्रहार संघटनेने कोरडा व ओळा दुष्काळासाठी निवेदन, उपोषण, बैलगाडी मोर्चा काढला. परभणी जिल्ह्याला काहीही मिळाले नाही. उलट नांदेड-हिंगोली जिल्ह्यात न मागणी करताच दिले. नुकसान सारखेच मात्र भेदभाव केल्याचे उघड दिसूनही परभणी जिल्ह्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दुर्लक्ष यात दिसत आहे.

- नरेश जोगदंड, प्रहार संघटना, पूर्णा

सततच्या पावसामुळे सोयाबीन काढण्यास अडचणी येत आहेत. अडीच एकरातील सोयाबीन काढून सुडी झाकून ठेवली आहे. मात्र, सुडीखाली पावसाचे पाणी जमा होऊन पिकाला कोंब फुटले आहेत. तर, काही पीक शेतात उभे आहे. यात देखील पावसाचे पाणी जमा झाले असल्याने नुकसान झाले आहे.

-शंकर कऱ्हाळे, शेतकरी