
परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ता. पाच फेब्रुवारी रोजी मोटर वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे यांच्याशी पार्श्वनाथ मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकासह त्यांच्या नातेवाईकांनी हुज्जत घातली होती.
परभणी ः येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी एका ड्रायव्हिंग स्कुलच्या संचालकांसह इतरांनी हुज्जत घालत त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.आठ) लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती घटनेचा निषेध नोंदविला.
परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ता. पाच फेब्रुवारी रोजी मोटर वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे यांच्याशी पार्श्वनाथ मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकासह त्यांच्या नातेवाईकांनी हुज्जत घातली होती. त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना घटनेच्या निषेधाचे निवेदन
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमवारी परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना घटनेच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपीला तात्काळ अटक करावी, आरोपींना कठोर शासन करावे, कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांना प्रशासकीय संरक्षण द्यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
एका आरोपीस अटक केली
परभणी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात घातलेल्या गोंधळ प्रकरणी पाच आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हे नोंद झालेले आहेत. त्या पैकी केवळ एका आरोपीस अटक केली आहे.
उर्वरित आरोपींस तातडीने अटक करावे अशी आमची मागणी आहे. यापुढे आरटीओ कार्यालयात असली झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही.
- श्रीकृष्ण नखाते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी