घाबरु नका; परभणी ‘सेफ झोन’मध्ये   

गणेश पांडे
शनिवार, 28 मार्च 2020

‘कोरोना’ प्रादुर्भाव झाल्यापासून ५६ जण परदेशातून परभणी जिल्ह्यात परत आले आहेत. त्या सगळ्यावर आरोग्य विभागाची कडक नजर आहे. ‘कोरोना’ संशयीताचा आकडा जरी वाढत असला तरी त्यात नेगिटिव्हचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब परभणीकरांसाठी निश्चित चांगली म्हणावी लागणार आहे.

परभणी : परभणीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ विषाणुचा एक ही संसर्ग झालेला रुग्ण अद्यापही परभणी जिल्ह्यात सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केंद्र व राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या सुचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून या संकटावर मात करण्यासाठी परभणीकरांनी एकोपा दाखविण्याची गरज आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव झाल्यापासून ५६ जण परदेशातून परभणी जिल्ह्यात परत आले आहेत. त्या सगळ्यावर आरोग्य विभागाची कडक नजर आहे. ‘कोरोना’ संशयीताचा आकडा जरी वाढत असला तरी त्यात नेगिटिव्हचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब परभणीकरांसाठी निश्चित चांगली म्हणावी लागणार आहे. 

देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील रहिवाश्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. ज्या लोकांना या घटनेचे गांभीर्य समजत नव्हते अश्यांना पोलिस प्रशासनाच्या आदरातिथ्याने समजूत घातली आहे. त्यामुळे गेल्या आठ ते  दहा दिवसापासून परभणी जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन आहे. कुणी कुठेही गर्दी करतांना दिसत नाही. बॅंकामध्येदेखील हा नियम काटेकोरपणे पाळला जात आहे. परिणामी या नियमांचे पालन होत असल्याने अद्यापही परभणी ‘कोरोना’च्या स्पर्शापासून दुर आहे. आपण सर्वांनी अश्याच पध्दतीने नियमांचे पालन व प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्य़ा सुचनांचे पालन करत राहू तर निश्चित परभणी जिल्हा हा कोरोना विषाणुच्या घातक स्पर्शापासून दुर राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

हेही वाचा - ‘कोरोना’च्या लढ्यात अनेक समाजसेवक उतरले

६२ जणांचे अहवाल नेगिटिव्ह
 सध्या परभणीच्या जिल्हा रुग्णालयाकडून ८५ संशयीताचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ६२ जणांचे अहवाल नेगिटिव्ह आले आहेत. प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विलगीकरणाची व्यवस्था अंत्यत काटेकोरपणे पालन केली जात आहे. घरात विलगीकरण झालेल्या नागरीकांनी देखील कटाक्षाने नियमाचे पालन सुरु केले आहे. आणखी काही दिवस आपण या नियमांचे पालन करून घरात थांबून कोरोना विषाणूला हद्दपार करूयात असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

हेही वाचा - संकट समयी सरसावले शेकडो ‘हात’

अशी आहे शुक्रवारपर्यंतची आकडेवारी

- एकूण नोंद झालेले संशयीत रुग्ण : १३४
- एकूण स्वॅब घेतलेले रुग्ण : ८५
- एकूण स्वॅब नेगिटिव्ह रुग्ण : ६२
- घरी विलगीकरण रुग्ण : ११०
- हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्ष : १२
- विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेले : १२
- परदेशातून आलेले  : ५६
- परदेशातून आलेल्याच्या संपर्कातील  : ५

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Parbhani 'safe zone'