परभणी चार पोकलेन, १४ हायवा, दोन बोटी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani sand mining four Poklen 14 truck two boats seized Police

परभणी चार पोकलेन, १४ हायवा, दोन बोटी जप्त

परभणी : जिल्ह्यात काही महिन्यांपासून वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. याची दखल जिल्हा पोलिस दलाने घेतली. मोहळा (ता.सोनपेठ) येथील गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी अवैधरीत्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे १८ हायवा, पोकलेन, दोन बोटी आदी वाहने पोलिसांनी छापा मारून जप्त केले. शिवाय ३५ चालक-मालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाळूमाफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. ठिकठिकाणच्या गोदावरी नदी, पूर्णा नदीच्या पात्रात रात्री-अपरात्री मोठमोठ्या यंत्रांच्या साहाय्याने वाळू उपसा केल्या जात आहे. तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही या अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याचा सूर सर्वत्र उमटत होता. परंतु, आता पोलिस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दोन बोटी, चार पोकलेन, १४ हायवा ट्रक व दोन हायवा ट्रकभर रेती असा ९४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. या प्रकरणी गंगाखेड येथील संजय मुंढे, वाहनांचे मालक समाधान बिडगर, शंकर बबन फड, अर्जुन गणपती तिवाड, शंकर साळुंके, भारत शिवाजी सूर्यवंशी, रामेश्वर उत्तमराव यादव, चालक नजीर सुभान बागवान, संजय अंकुश राठोड, अशोक वावळे, बालाजी विठ्ठल जाधव, बलभीम वैजनाथ डुमाणे, हरिभाऊ केशवराव उजगरे, दिलीप दत्ता राठोड यांच्यासह ज्या वाहनांच्या मालक व चालकांची नावे माहीत झाली नाहीत, अशा एकूण ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन वाहने जप्त करण्यात आली आहे.

पहाटे पाचच्या सुमारास छापा

बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीच्या पात्रातील पाण्यातील रेती बोटीने काढून काढलेली रेती पोकलेनच्या सहाय्याने हायवामध्ये भरून चोरून विक्री व साठा करण्यासाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मिना, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने पहाटे साडेपाचच्या सुमारास नदीपात्रावर छापा मारला. या ठिकाणी मोठ्या संख्येने वाळू भरून नेण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले हायवा आढळून आले. तसेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा होईल असे उत्खनन तसेच नदीच्या निचरा प्रक्रियेस क्षती पोचेल अशा प्रकारचे वर्तन त्या ठिकाणी पथकाला आढळून आले. पथकाने चालकांकडे विचारणा केली असता हे काम संजय मुंढे यांच्या सांगण्यावरून केल्याचे त्यांनी कबूल केले.