परभणी : कुलगुरु डॉ. अशोक ढवण धावले गुर दर्शनाला, 30 वर्षानंतर गुरु शिष्यांची भेट

गणेश पांडे
Saturday, 28 November 2020

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचे शालेय शिक्षक प्रभाकर कृष्‍णा देशपांडे हे एका कौंटुबिक कार्यक्रमासाठी परभणी येथे आल्‍याची माहिती कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना समजली.

परभणी ः ज्या शिक्षकाने आपल्याला शालेय जीवनात घडविले. उच्च प्रतिचे शिक्षण देवून चांगले संस्कार केले. त्याच शिक्षकांच्या आशीर्वादाने आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर विराजमान झालेले डॉ. अशोक ढवण यांना त्यांचे शालेय शिक्षक शुक्रवारी (ता.27) परभणीत आले असल्याची माहिती कळताच कुलगुरु सर्व कामे बाजूला सोडून धावत गुरु दर्शनाला गेले. तब्बल 30 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर गुरु - शिष्याची भेटीमुळे दोघांनाही आनंदाश्रु आवरता आले नाही.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचे शालेय शिक्षक प्रभाकर कृष्‍णा देशपांडे हे एका कौंटुबिक कार्यक्रमासाठी परभणी येथे आल्‍याची माहिती कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना समजली. त्यांनी तातडीने हातातील सर्व कामे बाजूला सारून स्‍वत: त्‍या कार्यक्रम स्‍थळी जाऊन श्री. देशपांडे गुरुजींची सदिच्‍छा भेट घेतली. कुलगुरु सारख्या उच्च पदावरील अधिकारी जेव्हा कोणतेही आमंत्रण नसतांनाही कार्यक्रम स्थळी येतो तेव्हा उपस्थित सर्वच जण आवाक्क झाले. कुलगुरु डॉ. श्री. ढवण यांनी श्री. देशपांडे गुरुजींचा सपत्‍नीक शाल, श्रीफळ देऊन सत्‍कार करून सन्‍मान केला. याप्रसंगी श्री. देशपांडे गुरुजींच्‍या कुटुंबातील सदस्‍य तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा -  Video - गंगाखेड : दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांनाही सोसाव्या लागतात यातना -

कुलगुरू यांचे शालेय शिक्षण लातुर जिल्‍हयातील मौजे उजनी येथील शाळेत झाले.  त्यावेळी श्री. देशपांडे गुरुजी यांचे मौजे उजणी जवळील मौजे धुत्‍ता हे मुळगाव होते. ते पावसाळयात नदी पोहुन पार करून शाळेत शिकविण्‍यासाठी येत असत. सध्या श्री. देशपांडे गुरुजींचे वय 90 वर्ष आहे.

30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भेट

तब्बल तीस वर्षानंतर गुरु - शिष्य भेट झाली, या भेटी दरम्‍यान दोघांनीही जुन्‍या आठवणी जागवविल्‍या, श्री. देशपांडे गुरुजींचेही डोळे पाणावले. त्‍यांचा विद्यार्थ्‍यी राज्‍यातील दोन कृषि विद्यापीठाचे कुलगुरू पदावर कार्यरत असल्‍यामुळे खुप अभिमान वाटत असल्‍याचे ते म्‍हणाले.

शालेय जीवनातच मी मराठी व हिंदी भाषेवर प्रभुत्‍व प्राप्‍त करू शकलो, याचे श्रेय श्री देशपांडे सरांना जाते. शिस्‍तीचे भोक्ते व हाडाचे शिक्षक म्‍हणुन त्‍यांची ओळख अजूनही आहे. विद्यार्थ्‍यांमध्‍ये त्यांचा मोठा दरारा असत. शालेय शिक्षणात जपानची भात शेती हा पाठ त्यांनी शिकवित असतांना शेती हे केवळ उदरनिवार्हाचे साधन नसुन ते शास्‍त्र व विज्ञान असल्याची बाब मनात बिंबवली, याची परिनिती पुढे मी कृषि शिक्षणाची कास धरली.

- डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Vice-Chancellor Dr. Ashok Dhawan visited Guru Darshan after 30 years parbhani news