
परभणी ः नवीन वितरण व्यवस्थेवर नळजोडण्यांच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेने कॅंपचा उतारा लागू केला असून त्याला यश मिळत असल्याचे चित्र आहे. तर प्रभाग समिती ‘ब’ नळजोडणी देण्यात आघाडीवर असून या समितीत दोन हजार दोनशेवर नागरिकांनी नळ कनेक्शन घेतले आहेत.
महापालिकेने ज्या भागात यापुर्वी वितरण व्यवस्था नव्हती, त्या भागातील नळजोडण्या देण्यास प्राधान्य दिले. त्या भागात अपेक्षित नाही. परंतु, बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातही प्रभाग समिती ‘ब’ नळजोडण्या देण्यात आघाडीवर आहे. या समितीकडे दोन हजार ३४२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन हजार २०६ नळजोडण्या प्रत्यक्ष देण्यात आल्या असून केवळ ३४ अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत. सहायक आयुक्त अल्केश देशमुख, अभियंता हेमंत दापकेकर अधिकाधिक नळजोडण्यांसाठी प्रयत्नशील आहेत. त्या पाठोपाठ प्रभाग समिती ‘क’ मध्ये एक हजार ३७० अर्ज दाखल झाले असून ९६२ नळजोडण्या देण्यात आल्या. सहायक आयुक्त सुधाकर किंगरे, अभियंता बालाजी सोनुले त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर प्रभाग समिती ‘अ’ मध्ये दोन हजार दोनशे अर्ज आले असून पाचशे नळजोडण्या देण्यात आल्या. सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, अभियंता प्रवीण हटकर उर्वरित अर्जांचा निपटारा करण्याचा, त्यातील त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आयुक्तांचे कॅंप घेण्याचे आदेश
नवनियुक्त आयुक्त देविदास पवार यांनी सर्व प्रभाग समित्यांना शिबिरे घेऊन नळजोडण्या देण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून नागरिकांना विविध ठिकाणी फिरावे लागू नये. एकाच ठिकाणी अर्ज व त्यातील तांत्रिक बाबी पूर्ण व्हाव्यात, हा त्या मागचा उद्देश आहे. त्याला अपेक्षित यश मिळत असून विशेषतः खानापुर गावात एकाच दिवशी दिडशेवर नळजोडण्या देण्यात आल्या. महापालिकेचे उद्दीष्ट ५० हजारांवर नळजोडण्या देण्याचे असून आत्तापर्यंत केवळ साडेतीन हजारावर नळजोडण्याच देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही पालिका उद्दीष्टापासून कोसो दुर आहे.
नागरिक अजुनही आशेवर
महापालिकेने नळजोडणीसाठी अनामत रक्कम म्हणून दोन हजार रुपये घेण्याचा निर्णय घेतला. परंतु शहराच्या जुन्या वितरण व्यवस्थेवरील नळधारकांनी यापुर्वी देखील नळ घेताना ठराविक अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे एकदा अनामत रक्कम भरण्यासाठी नागरिक द्विधा मनस्थितीत आहेत. त्यातच जुन्या नळधारकांकडून अनामत रक्कम घेऊ नये, अशी विविध पक्ष, संघटना मागणी करीत आहेत. त्यांच्या मागणीला यश येईल या अपेक्षेने अनेक नागरिक नळजोडण्या घेत नसल्याचे देखील चित्र आहे. परंतु, महापालिकेने योजना चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतुद करण्यासाठी ही अनामत रक्कम घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.