आशियाई क्रीडा स्पर्धेत परभणीच्या ‘ज्योती’ची कास्यपदकला गवसणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

- देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- मॅरेथॉनमध्ये दोन तास ५२ मिनिटे ४४ सेकंदात ४२ किलोमिटरचे अंतर केले पूर्ण 

परभणी : परभणीची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवतेने नेपाळ येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ४२ किलोमिटर अंतराच्या मॅरेथॉनचे कास्यपदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
 
नेपाळ येथे १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु असून शनिवारी (ता.सात) झालेल्या ४२ किमी अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व परभणी येथील ज्योती गवतेने कास्यपदकला गवसणी घालून आठ देशांच्या या स्पर्धेत भारताचा तिरंगा डोलाने फडकावला. ज्योतीने ही स्पर्धा २:५२:४४ वेळात पूर्ण करून कास्यपदक पटकावले.

या स्पर्धेत श्रीलंकेच्या हिरुणी केसरा हिने सुवर्ण, नेपाळच्या पुष्पा भंडारी हिने रौप्य पदक पटकावले. भारतीय संघातील जिग्मेट डोलमा हिने ३:०७:२४ मिनीटांची वेळ घेत पाचवे स्थान पटकावले. तिच्या या यशाबद्दल भारतीय पथकासोबत असलेले भारतीय आँलम्पिक महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता, भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, मध्यप्रदेश ऑलिम्पिंक संघटनेचे सचिव दिग्विजयसिंह यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.  

परभणीत अभिनंदनाचा वर्षाव
परभणी शहरात ज्योतीने कास्यपदक पटकावल्याची बातमी समजताच जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ज्योतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बोकारीया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे , क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा धिकारी शैलेंद्र गौतम, राज्य मार्गदर्शक संजय मुंडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. माधव शेजुळ, मंगल पांडे व डॉ. यु. डी. इंगळे, रणजित काकडे, सी. टी. नावाडे, गणेश माळवे , कैलास माने, प्रा. महंमद इकबाल, सुशिल देशमुख,  गुरुदास लोकरे,आदींनी तिचे कौतुक केले. 

‘ज्योती’ला न्याय मिळण्याची अपेक्षा

ज्योतीने आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधत्व केले आहे.  थायलंड, दक्षिण आफ्रिका, चीन या देशात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भारताचे सहा वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच मुंबई, पुणे, हैद्राबाद, बेंगलोर, सुरत, दिल्ली येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा देखील गाजवल्या आहेत. परंतु ज्योतीच्या कार्याची दखल शासन, महासंघ स्तरावर अद्यापही दखल घेतल्याचे दिसून येते. ज्योती गेल्या आठ ते दहा वर्षापासून परभणी सारख्या शहरात कुठल्याही सुविधा नसतांना प्रशिक्षक रवि रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व सुविधा, आहाराच्या सुविधा, फिजीओ तिला उपलब्ध नाही. अशाही परिस्थितीत ज्योती उठावदार, लक्षवेधक कामगिरी करत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani's 'Jyoti' bronze medalist in Asian Games