esakal | डॉक्टरांच्या दक्षतेमुळे फसला त्याचा प्लॅन 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र.

त्याने मुंबईतून परतल्याचे खोटेच सांगितले आणि होम क्वारंटाइनचा शिक्का लावून तो गावी परतला. डॉक्टरांनी दक्षता बाळगत त्याच्याबाबत जिल्हा रुग्णालयात चौकशी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. डॉक्टरांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा शोधही घेतला.  

डॉक्टरांच्या दक्षतेमुळे फसला त्याचा प्लॅन 

sakal_logo
By
दिलीप दखने

वडीगोद्री (जि.जालना) - येथील डॉक्टरांनी परदेशातून परतलेल्या एका कोरोना संशयितास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी (ता.२८) पाठविले होते. मात्र तेथे त्याने मुंबईतून परतल्याचे खोटेच सांगितले आणि होम क्वारंटाइनचा शिक्का लावून तो गावी परतला. डॉक्टरांनी दक्षता बाळगत त्याच्याबाबत जिल्हा रुग्णालयात चौकशी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. डॉक्टरांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा शोधही घेतला. मात्र रुग्णवाहिका न आल्याने पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यास जालन्याला हलवावे लागले. 

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती परदेशातून आली होती. आरोग्य विभागाचे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षण सुरू असताना त्याची माहिती मिळाली. त्याला शनिवारी (ता.२८) वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलाविण्यात आले. तेथून कोरोनाबाबत प्राथमिक तपासणी करून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सोबत वडीगोद्रीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांचे पत्रही देण्यात आले. जिल्हा रुग्णालयात गेल्यावर डॉ. जावळे यांनी दिलेले पत्र न दाखवता, मी मुंबईवरून आलो अशी खोटी माहिती त्याने सांगितली. तेव्हा तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला होम क्वारंटाइनचा शिक्का मारून परत पाठवले. पण जेव्हा डॉ. सुशील जावळे यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली असता ही बाब लक्षात आली.

डॉ. सुशील जावळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे यांना कळवले. डॉ. रोडे यांनी ताबडतोब ती माहिती सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांना कळवली. श्री. वारे यांनी ताबडतोब सूत्रे हलवून त्याचा शोध सुरू केला. दुपारी दोन वाजेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला घेऊन आले.

वडीगोद्री केंद्राची रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी जालना येथे गेली होती. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी रोडे यांनी शहागड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश देशमुख व चालक भरत वाघुम्ब्रे यांना रुग्णवाहिका घेऊन त्या संशयित रुग्णाला जालना येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचे आदेश दिले. परंतु चालकाने येण्यास स्पष्ट नकार दिल्याचे डॉ. जावळे यांनी सांगितले. वडीगोद्री केंद्राची रुग्णवाहिका येईपर्यंत जवळपास पाच तासांचा कालावधी लागला. तोपर्यंत हा संशयित रुग्ण आरोग्य केंद्रातच बसून होता. 

संबंधित रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर शहागडच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- शशिकांत हदगल, 
उपविभागीय अधिकारी, अंबड 

संबंधित रुग्णवाहिका चालक आणि त्या संशयित रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शशिकांत हदगल यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत. तेव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. 
- डॉ. विलास रोडे, 
तालुका वैद्यकीय अधिकारी, अंबड 

  •  परदेशातून परतलेल्याची पुन्हा रुग्णालयात रवानगी 
  • मुंबईतून आल्याची खोटीच दिली होती माहिती 
  • उपचाराऐवजी होम क्वारंटाइनचा शिक्का लावून परतला 
  • पोलिसांच्या मदतीने काढले शोधून 
  • रुग्णवाहिका न आल्याने पाच तासांची प्रतीक्षा 
loading image