लातुरात नो रिस्क अन् रेफर पॅटर्न संपेना, कोरोनाच्या काळात स्त्री रुग्णालयात रुग्णांची दुप्पट गर्दी

विकास गाढवे
Tuesday, 6 October 2020

लातूर  जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांचा ‘नो रिस्क अन् रेफर पॅटर्न’ संपता संपत नसल्याचे चित्र आहे.

लातूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांचा ‘नो रिस्क अन् रेफर पॅटर्न’ संपता संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाच्या काळात येथील कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी रुग्णांची गर्दी दुपटीने वाढली आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याची दखल घेतली असून, रेफर पॅटर्नवर नियंत्रण आणण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन गरज असेल तरच रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित (रेफर) करण्याबाबत बजावले आहे.

‘भाषेवर जितके प्रेम अधिक असेल तितकी ती बहरते’

लेबर कॉलनीत शंभर खाटाचे स्त्री रूग्णालय असून, पूर्वी रुग्णालयात दर महिन्याला तीनशे ते चारशे प्रसूती करण्यात येत होत्या. यात निम्म्या संख्येने सिझेरियन शस्त्रक्रियांचा समावेश होता. मागील महिन्यांपासून ही संख्या दुप्पट झाली आहे. रुग्णालयावर मोठा ताण येत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील नॉन कोविड रुग्णही स्त्री रूग्णालयात रेफर करण्यात येत आहेत. यासोबत जिल्हाभरातून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांतून रेफर होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोणीच जबाबदारी (रिस्क) घेत नसल्याने हा प्रकार घडत आहेत.

अनेक उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञ व स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर असतानाही तिथे रिस्क नको म्हणून सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. आरोग्य केंद्रांकडून नॉर्मल प्रसूती होणारे रुग्ण ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले जातात. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात सुविधा असतानाही रुग्णांना स्त्री रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे स्त्री रूग्णालयात गर्दी वाढून कोरोनाच्या काळात रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ लागली.

सतत होणारे अपघात पाहवत नसल्याने अखेर पोलिसांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

याची दखल जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी घेऊन ‘नो रिस्क आणि रेफर पॅटर्न’वर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले. त्याचा नियमित आढावा घेऊन गरज नसताना रुग्ण रेफर केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला. त्यानुसार डॉ. परगे यांनी प्राथमिक केंद्रनिहाय आढावा घेऊन गुंतागुंतीची परिस्थिती असल्यासच रुग्ण रेफर करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. दरम्यान, सध्या आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती अन्य आजाराच्या रुग्णांची परवड होत आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थितीही दुर्मिळ झाली आहे.

शिरोळ वांजरवाड्यात सर्वाधिक प्रसूती
उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय व आरोग्य केंद्रांसोबत उपकेंद्रांतही प्रसूतीची सुविधा आहे. जबाबदारीने काम केल्यास सर्वच संस्थांत प्रसूती होऊ शकतात. गुंतागुंतीचे कारण पुढे करून जबाबदारी झटकल्यास त्याला पर्याय असू शकत नाही. या `नो रिस्क अन् रेफर पॅटर्न`मध्ये शिरोळ वांजरवाडा (ता. निलंगा) उपकेंद्रात सर्वाधिक प्रसूती झाल्या आहेत. उपकेंद्राच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले. नळेगाव (ता. चाकूर) केंद्रांत चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक ९० प्रसूती झाल्या आहेत. भूलतज्ज्ञ व स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर असलेल्या संस्थांनी आपत्तीकालीन परिस्थितीत समर्पणाच्या भावनेतून काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कपाशी, सोयाबीन पाण्यात; शेतकऱ्यांनी शेतातील पावसाचे पाणी काढण्यासाठी लावले...

महिन्यापासून स्त्री रूग्णालयात प्रसूतीचा ताण वाढला आहे. दुपटीने रुग्ण येत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील नॉन कोविड रुग्णही रूग्णालयात रेफर होत आहेत. जिल्हाभरातून रूग्ण येत असून, उपचार देताना सुरवातीला कसरत झाली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहेत. शंभर खाटाप्रमाणे रुग्णालयात पुरेशे डॉक्टर व कर्मचारी आहेत.
- डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय, लातूर.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients Crowd In Stri Hospital Latur News