esakal | दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नियमांचे उल्लंघन केल्यास किराणा दुकानदार व दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे, असा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर, (जि. परभणी) : लाॅकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणारे किराणा दुकानदार व दुचाकीस्वार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामधून जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग केला जाणार आहे. रस्त्यवरची गर्दी टाळण्यासाठी, सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सेवा समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
  ‘कोरोना’च्या पार्श्वभूवर केंद्र व राज्य शासन प्रशासनामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. नागरिकांना घरीच थांबण्याचे, ग्राहक, दुकानदार यांनी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी तसेच विनाकारण रस्त्यावर दुचाकीवर फेरफटका मारू नये यासाठी प्रशासनाने वारंवार सूचना करूनसुद्धा उपयोग होत नसल्याने यावर कठोर पावले उचलण्यासंदर्भात शनिवारी (ता. २८)  तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती व नगर परिषद प्रशासनाची बैठक पार पडली.

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये दंड
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शहरातील किराणा दुकाने व भाजी मार्केट एक दिवसआड सुरू राहणार आहे. किराणा दुकानदारांनी सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. याचे उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये आणि विनाकारण दुचाकीचा रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला वर्ग  करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन पथके नियुक्त करण्यात आली असून ही पथके किराणा दुकाने, भाजी मार्केटसह शहरात सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे. तेव्हा नागरिकांनी या कठीण प्रसंगी स्वत:सोबतच कुटुंबीयांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी घरीच थांबावे व ठरवून दिलेले नियम पाळून शासन व प्रशासानाला सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. सदरील बैठकीस नगर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, ॲड. मनोज सारडा, ॲड. विनोद राठोड, विजय चोरडिया, बाळासाहेब काजळे आदींसह व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, पालिका व महसूलचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.