कानडगाव शिवारात बिबट्याची दहशत

संतोष गंगवाल 
Saturday, 28 September 2019

देवगाव रंगारी : कानडगाव वेरूळ (ता. कन्नड) शिवारात मादी बिबट्यासह दोन पिले आढळून आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना करीत आहेत. 

देवगाव रंगारी : कानडगाव वेरूळ (ता. कन्नड) शिवारात मादी बिबट्यासह दोन पिले आढळून आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना करीत आहेत. 

पावसाने शेतात चिखल झाल्याने तपासकामात अडथळा निर्माण होत आहे. वनक्षेत्रपाल अधिकारी काजी यांनी ग्रामस्थांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी तत्काळ सापळे लावून बिबट्या पकडण्याची मागणी केली आहे. कानडगाव शिवारात सध्या बाजरी, टोमॅटो काढण्यासाठी शेतकरी व मजूर शेतीकामात व्यस्त आहेत. दरम्यान, गट क्रमांक 18 व 19 मध्ये गुरुवारी (ता.26) संध्याकाळी पाच ते सहादरम्यान शेतकरी भारत बोर्डे व अंकुश नागुर्डे काम करीत असताना त्यांना हरीण व काळविटाचे मृतदेह अर्धवट खाल्लेले आढळून आल्याने त्यांनी परिसरात पाहिले असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. अधिक पाहणी केल्यानंतर बिबट्याची पिले शेतातील झाडाच्या परिसरात दिसून आल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी घराकडे धाव घेतली. याबाबत चांगदेव सावडे, रुस्तुम भोसले यांनी ही घटना वन विभागाला कळवली. त्यावर वनक्षेत्रपाल काजी, वनरक्षक ताठे यांच्यासह इतर कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

अंदाजे चार दिवसांपूर्वी बिबट्याने खाल्लेला अर्धवट हरणाचा मृतदेह आढळून आला. तसेच शिकार केलेले एक काळवीट दिसून आले. पाहणीदरम्यान पथकाला झाडाजवळ दोन पिलेदेखील दिसल्याने तत्काळ त्यांना खबरदारीचा उपाययोजना करण्यासाठी तीव्र प्रकाशाच्या बॅटरीचा उपयोग करून परिसरात शोध घेतला. शुक्रवारीही (ता. 27) सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी कानडगाव शिवारातील परिसरात पायी शोधमोहीम घेऊन आढळून आलेल्या ठशांवरून बिबट्याचा माग काढला. याविषयी वन विभागाचे काजी यांना विचारले असता त्यांनी ग्रामस्थांची सुरक्षा हे प्रथम कर्तव्य असून त्यासाठी सर्व वन कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी एस. ए. काजी, वनपाल जीवन घुगे, वनरक्षक ताठे, श्री. वाघमारे, श्री. माळी, श्री. शेख, श्री. सोनवणे, श्रीमती निकुले, श्री. गिरी यांच्यासह वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Fear To Leopard In Kanadgaon-Verul Area