Video : परभणीचे ‘हे’ गाडगेबाबा देतात स्वच्छतेचा संदेश

file photo
file photo

परभणी : स्वच्छता म्हटल की आधी डोळ्यासमोर उभे राहतो तो राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा चेहरा. याच महान संताने देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. परभणीतही संत गाडगेबाबा यांचा वारसा चालविण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा एक अवलिया आहे. कमळाजी किशनराव कावळे ऊर्फ कावळे मामा अस या अवलियाच नाव आहे. १४ वर्षांपासून ते सातत्याने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करत असतात. परंतु, या कोरोना विषाणू संसर्गाच्या दिवसांत कावळे मामांचे कार्य खऱ्या अर्थाने जगासमोर आले आहे.

कावळे मामा हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे वय ६० वर्षे आहे. परभणी शहरासह मराठवाड्यातील कोणत्याही शहरात ते गेले तर त्यांचे स्वच्छतेचे नित्यनियमाचे काम ते केल्याशिवाय राहात नाहीत. परभणी शहरातील खानापूर फाटा भागातील अंबाभवानी नगरमध्ये ते वास्तव्यास आहेत. त्यांचा खरा व्यवसाय हा कटलरी वस्तूंचा हातगाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आता वय वाढल्याने व मुलगा हाती आल्याने त्यांनी गाडा चालविण्याचे काम सोडून दिले आहे. त्यांचा मुलगा हा व्यवसाय सांभाळतो. परंतु, कावळे मामांनी त्यांचे स्वच्छतेचे काम मात्र सोडले नाही.


स्वच्छतेचा वारसा आईकडू मिळाला
स्वच्छतेचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला आहे. आई साळूबाई या लोकांच्या घरी घरकाम करत असत. त्यातूनतच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. वडील किशनराव कावळे रोजमजुरी करत असत. उरलेल्या वेळात त्यांच्या आई परिसरातील रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करायच्या, ते ही कोणताही मोबदला न घेता. १९९६ मध्ये कावळे मामाच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून कमळाजी कावळे यांनी आईचा वारसा पुढे आपण चालवायचा असे ठरविले. दररोज ठराविक वेळी कटलरीचा गाडा चालवून उरलेल्या वेळेत ते स्वच्छतेची कामे करण्यास सुरवात केली.

केशरी ड्रेसवरच दिसतात कावळे मामा
कावळे मामा ज्या परिसरात स्वच्छता करतात. त्या परिसरातील सर्वचजण त्यांना ओळखतात. केशरी ड्रेसवरच ते या कामास जातात. कारण केशरी रंग हा त्यागाचे प्रतिक आहे, असे मानून ते आपले काम नेटाने करत असतात. रस्त्याने चालतांना कुठेही कचरा दिसला तर ते सरळ सायकलवरून उतरतात व जवळच्या झाडूने तो परिसर स्वच्छ करतात. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता केली त्या ठिकाणाहून ते एक रुपयाही घेत नाही किंवा चहादेखील पित नाहीत. केवळ निस्वार्थपणे सेवा ते बजावत असतात.

सायकल व दोन गोण्या सोबतच
कावळे मामा दररोज घराच्या बाहेर पडताना सायकलच्या दोन्ही बाजूला गोण्या बांधतात. कचऱ्याने भरलेल्या दोन्ही गोण्या दिवसातून दोन वेळा त्यांना रिकाम्या कराव्या लागतात. एखादी मोठी कचराकुंडी अथवा घंटागाडी पाहून मामा हा कचरा त्यात टाकून देतात. शहरातील महापुरुषांचा पुतळा परिसर, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, स्टेशन रोड, गांधी पार्क, नानलपेठ व जिल्हा रुग्णालयात ते नित्यनेमाने स्वच्छता करत असतात.

महापालिकेने दिले ओळखपत्र
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात कावळे मामा सातत्याने शहरात स्वच्छता करत फिरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी त्यांना स्वच्छतादूत म्हणून ओळखपत्रही दिले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com