अरेरे!!! मुलाचा जीव गेला; पण पित्याला मिळेना न्याय (वाचा घडले तरी काय)

सुषेन जाधव
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • न्यायालयालाही जुमानेना पोलिस विभाग
  • गृहविभागासह, औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षकांना नोटीसा
  • खूनी सापडूनही येऊनही कारवाई नाही
  • पित्याने ठोठावले खंडपीठाचे दरवाजे

औरंगाबाद : मुलाचा खून झाला. पिता पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेला तर तिथे संशयित हजर; मात्र तक्रारीनंतरही काहीच पावले उचलण्यात आली नाहीत. प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या पित्याला खंडपीठाने दिलासा; पण पोलिस विभागाने न्यायालयालाही जुमानले नाही. प्रकरणात दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने गृह सचिव सुनील पोरवाल, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि चिकलठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणी झाली.

हे वाचलंत का? - हवालदाराच्या तोंडावर  कैद्याने फेकला चहा

याचिकाकर्ता राशीद खान नन्ने खान यांचा मुलगा रिझवान (वय 35) हा शेंद्रा परिसरातील नूर एंटरप्राईजेस कंपनीमध्ये पहारेकरी (वॉचमन) म्हणून काम करीत होता. सदर कंपनीचे मालक आणि त्यांचे भागीदार यांच्यात कंपनीच्या ताब्यावरून वाद होता. 1 मे 2019 ला काही लोक कंपनीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या सशस्त्र हल्ल्यात रिझवानचा मृत्यू झाला.

उलट पित्याचीच परवड
रिझवानचे वडील मुलाच्या खुनाची तक्रार देण्यास चिकलठाणा पोलिस ठाण्यात गेले असता रिझवानचा खून केल्याचा संशय असलेले लोक पोलिस ठाण्यातच होते. तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. म्हणून घटनेच्या तिसऱ्या दिवशी राशीदखान यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज देऊन 29 एप्रिल ते 2 मेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती केली. पोलिसांनी ते दिले नाही म्हणून त्यांनी ऍड. अजय तल्हार यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. खंडपीठाने फुटेज देण्याचा आदेश दिला असता फुटेज 30 दिवसांनंतर आपोआप नष्ट होते, असा जबाब पोलिसांनी आणि नंतर पोलिस अधीक्षकांनीसुद्धा दाखल केला. उच्च न्यायालयाने एक वर्षापर्यंत फुटेज जतन करण्याचा आदेश लेनार्ड वाल्डारीस यांच्या याचिकेत दिला असल्याचे ऍड. तल्हार यांनी निदर्शनास आणून दिले असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. ऍड. तल्हार यांना ऍड. प्रमोद गायकवाड आणि ऍड. तुषार डवरे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा - औरंगाबाद : गाणे गाण्यावरून डॉक्‍टरांत मारामारी, अश्‍लील शिवीगाळही

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petiton filed in HighCourt bench Aurangabad for justice of son's Murder