वारकऱ्यांनी घातलं विठ्ठलाला कळकळीने साकडं

सुशांत सांगवे
गुरुवार, 11 जुलै 2019

हे विठ्ठला, पून्हा दुष्काळ पडू देऊ नकोस. पून्हा पाण्यासाठी वणवण भटकायला लावू नकोस. पून्हा पाण्यासाठी कोणाला जीव द्यायला लावू नकोस. तुझ्या कृपेने भरपूर पाऊस पडू दे. ओसाड पडलेली सगळीकडची रानं हिरवीगार होऊन सारे काही आबादानी होऊ दे.. अशा भावना लातूरमधून पंढरपूला निघालेल्या शेतकरी-वारकऱ्यांनी ‘सकाळ’कडे गुरूवारी व्यक्त केल्या.

लातूर : हे विठ्ठला, पून्हा दुष्काळ पडू देऊ नकोस. पून्हा पाण्यासाठी वणवण भटकायला लावू नकोस. पून्हा पाण्यासाठी कोणाला जीव द्यायला लावू नकोस. तुझ्या कृपेने भरपूर पाऊस पडू दे. ओसाड पडलेली सगळीकडची रानं हिरवीगार होऊन सारे काही आबादानी होऊ दे.. अशा भावना लातूरमधून पंढरपूला निघालेल्या शेतकरी-वारकऱ्यांनी ‘सकाळ’कडे गुरूवारी व्यक्त केल्या.

विठ्ठल सूर्यवंशी (आरजखेडा, ता. रेणापूर) : "मी वयाच्या सत्तरीपर्यत पोचलो आहे. पण अगदी लहान असल्यापासून वारीत सहभागी झालो आहे. त्यावेळी आजोबा मला वारीत घेऊन जायचे. तेव्हापासून हे चक्र सुरूच आहे. विठ्ठलाची भक्ती करण्याची संधी मिळते, याहून दुसरा आनंद नाही. नुकत्याच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पण पाऊस आला नाही तर सगळं करपून जाईल, अशी भीती मनात आहे. ती विठ्ठलासमोर मांडणार आहे."
---
हकानी इस्माईल शेख (बेळगाव, ता. चाकूर) : "मी मुस्लिम असलो तरी दरवर्षी पंढरीच्या वारीत मनोभावे सहभागी होत आलो आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे. देवाच्या दरबारात जात-धर्म काहीही नसते. यंदा दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे. प्यायला पाणी नाही. जनावरांना खायला चिपाड नाही, अशी सगळी स्थिती आहे. पांडुरंगाने हा दुष्काळ नाहीसा करावा."
---
तेजाबाई बेनाळे (हडोळती, ता. अहमदपूर) : "आम्ही गावातील काही महिला एकत्र येऊन वारीत सहभागी होतो. यंदा सगळीकडंच दुष्काळ आहे. पाऊस आला की पेरणी करायची, आम्ही ठरवलं आहे. पण पाऊसच नाही. त्यामुळे या भागात पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही विठ्ठलाच्या भेटीसाठ निघालो आहोत. आमचे विठ्ठलाकडे एकच मागणे आहे, भरपूर पाऊस पडू दे."
---
शिला कांबळे (लातूर) : "दुष्काळामुळे महागाई प्रचंड वाढली आहे. भाजीपाला घेणंसुद्धा सर्वसामान्यांना परवडत नाही, अशी स्थिती आहे. पाणीसुद्धा विकत घ्यावं लागत आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून लातूरात हीच स्थिती आहे. ही भयान स्थिती बदलावी. सगळीकडं सुख-शांती येऊ दे. लोकांचे हाल कमी होऊ दे, असं साकडं आम्ही विठ्ठलचरणी घालणार आहोत."
---
किसनराव बिरादार (तगरखेडा, ता. निलंगा) : "पूर्वी पायी चालत वारीत सहभागी व्हायचो. आळंदीतून निघणाऱ्या मुख्य वारीतसुद्धा गेलो आहे. आता फार चालणे होत नाही. त्यामुळे एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. पण विठ्ठलाच्या भेटीकडे जाण्याची आस थांबली नाही. वारीत सहभागी झाल्यामुळे मनाला मिळणारी शांती दुसऱ्या कशातही नाही. त्यासाठीच दरवर्षी नियमाने पंढरपूरला जातो. यंदा सगळीकडं आबादानी होऊ दे, हे विठ्ठलाकडे आमचे मागणे आहे."
---
श्रीराम गुरमे (अहमदपूर) : "दुष्काळामुळे शेतं ओसाड पडली होती. तेवढ्यात पावसाचा एक सडाका झाला म्हणून आम्ही पेरायला सुरवात केली. पण पुन्हा पाऊस आलाच नाही. उगवलेलं पीक आता सुकायला लागलं आहे. पासऊ आलाच नाही तर लोकांचे हाल आणखी वाढणार आहेत. असं होऊ नये, हेच विठ्ठलाकडे मागायचे. शेवटी विठ्ठलाला तर सगळं माहिती आहेच. त्यामुळे पाऊस पडेल, याची खात्री आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pilgrims prayed for rains