पेपर, कापडी बॅगचा वापर वाढला, औरंगाबादमध्ये 80 टक्‍के प्लॅस्टिकबंदी यशस्वी 

प्रकाश बनकर
शनिवार, 25 मे 2019

औरंगाबाद : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची शहरात अंमलबजावणी सुरू आहे. शहरात फळे-भाजीपाला विक्रेते सोडता सर्वांनी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद केले आहे. सद्यःस्थितीत शहरात 80 टक्‍के प्लॅस्टिक बंद झाले आहे, अशी माहिती शुक्रवारी (ता. 24) प्लॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी दिली. 

औरंगाबाद : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची शहरात अंमलबजावणी सुरू आहे. शहरात फळे-भाजीपाला विक्रेते सोडता सर्वांनी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद केले आहे. सद्यःस्थितीत शहरात 80 टक्‍के प्लॅस्टिक बंद झाले आहे, अशी माहिती शुक्रवारी (ता. 24) प्लॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी दिली. 

राज्यात 23 मार्च 2018 ला प्लॅस्टिकबंदीची घोषणा झाली होती. त्यानंतर तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर औरंगाबाद शहरात महापालिकेने प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे शहरात बाजारपेठेतून बंदी असलेले प्लॅस्टिक गायब झाले. त्याच्या जागी कापडी बॅग आणि पेपर बॅगचा वापर वाढला आहे. किराणा दुकानापासून ते कापड, हॉटेल चालकांपर्यंत सर्वांनी बंदी असलेल्या प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवी आणि नियमात बसणाऱ्या 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या कॅरिबॅग वापरणे सुरू केले आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांनी महापालिकेस सहकार्य केल्यामुळे सद्यःस्थितीत शहरात 80 टक्‍के प्लॅस्टिकबंदी झाली आहे. 

हातगाडी चालकांकडे प्लॅस्टिक पिशव्या? 
एकीकडे 80 टक्‍के प्लॅस्टिकबंदी असली तरी शहरातील हातगाडी चालकांकडे बंदी असलेले प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. महापालिकेच्या कारवाई करणाऱ्या पथकांना चकवा देऊन हा सारा प्रकार सुरू आहे. फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांकडेही बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आढळून येत आहेत. शहरात बंदी असलेले प्लॅस्टिक मिळत नसल्याने हे विक्रेते बाहेरील राज्यांतून बंदी असलेले प्लॅस्टिक मागवत आहेत. 

पाच हजारांच्या दंडाचा धाक 
महापालिकेतर्फे प्लॅस्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माजी सैनिकांचे पथक नेमण्यात आले आहे. हे पथक शहरात विविध ठिकाणी फिरत कारवाई करीत आहे. पाच हजार रुपयांपासून कारवाईत दंड वसूल करण्यात येत आहे. यामुळे या दंडाचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे. 

शहरात प्लॅस्टिकबंदी 80 टक्‍के झाली आहे. इतर शहरांच्या तुलनेत बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर फेरीवाले, फळविक्रेतेच मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. बाकी पेपर आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यांची मागणीही वाढली आहे. महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापक नंदकुमार भोंबे यात विशेष लक्ष देऊन काम करीत असल्यामुळे हा परिणाम झाला आहे. 
- ओमप्रकाश भुतडा, अध्यक्ष, प्लॅस्टिक असोसिएशन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic ban successful at Aurangabad