नवरा-बायकोच्या भांडणात गावाचा जीव धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नवरा-बायकोच्या भांडणात संतप्त नवऱ्याने हा फवारणीच्या विषारी औषधाचा डबा अंधारात घराबाहेर फेकून दिला.तो पडला गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या  विहिरीत. त्यामुळे डब्यातील विषारी औषध विहिरीत मिसळले.

जालना -  नवराबायकोत कुठल्या तरी कारणाने बुधवारी (ता. 14) रात्री कुरबूर झाली. त्याचे रूपांतर वादात झाले. त्यातच या वादात कपाशीवरील फवारणीसाठीचा विषारी औषधाचा डबाही आला. हा डबा पतीने रागाने घराबाहेर फेकला आणि तो पडला गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत. ही बाब गुरुवारी (ता. 15) सकाळी लक्षात आली, अन्यथा नवरा-बायकोच्या भांडणात अख्ख्या गावाचा जीवच धोक्‍यात आला होता. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना तालुक्‍यातील इंदलकरवाडी ग्रामपंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ एकाचे घर आहे. या विहिरीचे पाणी संपूर्ण गावास ग्रामपंचायतीकडून वितरित केले जाते.

हेही वाचा : पशुंच्या जगातून बाळ माणसांच्या दुनियेत... 

या विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या एकाच्या घरात बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान नवरा-बायकोत वाद झाला. या वादात नवरा-बायकोच्या हातात कपाशीवरील फवारणीच्या विषारी औषधाचा डबाही आला. प्रकरण चांगलेच तापले. त्यामुळे संतप्त नवऱ्याने हा डबा अंधारात घराबाहेर फेकून दिला.तो पडला गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या  विहिरीत. त्यामुळे डब्यातील विषारी औषध विहिरीत मिसळले. पाण्याचा रंगही पांढरा झाला.

हेही वाचा : नहारचा घात गावठीच्या गोळीनेच... 

दरम्यान, ही बाब ग्रामपंचायतीचे सेवक नारायण घोलप यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखत तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी श्री. घोलप यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार श्री. कणखर हे करीत आहेत.  

कोंबड्याच्या नादात गमाविले पंचावन्न हजार

जालना शहरातील मंगळबाजार येथे गावरान कोंबडे खरेदी करीत असताना एका ज्येष्ठ महिलेचे 55 हजार रुपये एका चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. 14) घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
पेन्शपुरा परिसरातील पिवळा बंगला येथील शशिकलाबाई सुखानंद साठे (वय 65) या ज्येष्ठ महिलेने मंगळवारी (ता.14) बॅंकेतून पैसे काढले. त्यानंतर खरेदीसाठी त्या मंगळबाजार येथे गेले. मंगळबाजार येथे गावरान कोंबडे घेण्यासाठी त्या थांबल्या. त्यांनी कोंबडे खरेदी केले आणि पैसेही दिली. याच गडबडीत गर्दीचा फायदा घेत भामट्याने त्यांच्या हातातील पिशवीमधील 55 हजार रुपये ठेवलेले पाकीट लंपास केले. यात पैशांसह आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि फोटोही होते. या घटनेनंतर शशिकलाबाई साठे यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. लांडगे हे अधिक तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poison mixed in well in Indalkarwadi Jalna